Total Pageviews

Monday, October 22, 2012

अपूर्ण ...

अपूर्ण जसे फुल गंधाशिवाय अपूर्ण असे मन प्रेमाशिवाय अपूर्ण जसे इंद्रधनू रंगाशिवाय अपूर्ण असे रात्र चांदण्यांशिवाय अपूर्ण जसे आयुष्य श्वासांशिवाय अपूर्ण असे मी हि तुझ्याशिवाय कोमल ........................२२\१०\१२

Sunday, September 11, 2011

तोच तो एक भाव ...

तोच तो एक भाव वाटतो नभी जसा
तोच एक वेडा भाव दाटतो मनी असा
तोच शब्द तोच अर्थ साठतो उरी जसा
तीच आस तोच भास करतो वेडापिसा

धुंद गीत धुंद प्रीत अशीच वेडी भावना
बेधुंद या मनातली धुंद वेडी याचना
तोच गंध तोच बंध सदैव हीच कामना
तेच सूर सदा जुळावे एक वेडी योजना

तोच साद तोच आवाज ओळखीचा वाटला
तोच स्पर्श तोच श्वास मनात होता साठला
तोच एक मृदुगंध जरी उरी भरून राहिला
तीच मी तोच तो अन एकांत अनोळखी वाटला

कोमल .....................................११/९/११

Sunday, August 28, 2011

आर्तता ...


शरीराने जरी नसे मी खंबीर
तरी मनाने कमजोर मज समजू नका ..

रणांगणात जरी नसे मी धाडसी
तरी समाजात दुबळी मज समजू नका ..

धनाने जरी नसे मी श्रीमंत
तरी मनाने लाचार मज समजू नका ..

शब्दांनी जरी नसे मी प्रगल्भ
तरी मौनाने शांत मज समजू नका ..

सत्पुरुषाप्रमाणे जरी नसे मी दैवी
तरी माझ्यातला माणूस विसरू नका ..

कोमल .............................२८/८/११

Saturday, August 13, 2011

किलबिलाट...


अचानक समोरच्या झाडावर
चुळबूळ जाणवली
त्या घरट्यात पाखरांची
आई परतली होती ...

ती नकळत कुणाचीतरी
आठवण करून गेली
त्या चिमण्या किलबिलाटाने
शांतता व्यापून टाकली होती ...

गेल्या पावसाळ्यात मी हि आईच्या
मागे असाच किलबिलाट करत होते
अन या पावसाळ्यात मी एकटीच
समोरचा किलबिलाट पाहत होते ...

कोमल .........................१३/८/११

ती अन मी


ती स्वर्गातील गोंडस परी
अन मी दगड मातीतला ...

ती उषेचे रंग नवे
अन मी अंधार डोहातला ...

ती हलकीशी सर
अन मी पाऊस वळवातला ...

ती गोड खुललेली कळी
अन मी काटा पानातला ...

ती श्रावणातला निसर्ग
अन मी निष्पर्ण ग्रीष्मातला ...

ती झुळूक सुखावणारी
अन मी वादळ मनातला ...

कोमल ...................१३/८/११

Tuesday, August 9, 2011

कधी वाटे ....

कधी हळुवार कधी रुक्ष तू
कधी शांत कधी चंचल तू
कधी मिटलेल्या पानातील
एक नाजुकशी कळी तू ....

कधी रात्र कधी अंधार तू
कधी भास कधी आभास तू
कधी रिक्त आभाळातील
एक अंधुक चांदणे तू ....

कधी जवळ कधी दूर तू
कधी किनारा कधी सागर तू
कधी नकळत येणारी
हलकीशी झुळूक तू ....

कधी प्राजक्त कधी चाफा तू
कधी पानगळ कधी हिरवळ तू
कधी माझ्याच ओंजळीत
एक दडलेला मोती तू ...

कोमल ..................८/८/११

Tuesday, May 24, 2011

तो असाच येतो ...

तो असाच येतो ...
अन दाटून जातो ...
भरलेल्या पापण्यांना सामावून घेतो ...

तो असाच येतो ...
क्षणात बरसून जातो ...
मृदुगंध प्रीतीचा दरवळून जातो ...

तो असाच येतो ...
अन चिंब भिजवतो ...
कोरड्या मनाला सुखावून जातो ...

तो असाच येतो ...
अन वेडावून जातो ...
जुन्या आठवणींना उजळवून जातो ...

तोच तो पाऊस अन त्याच्या आठवणी ...

कोमल .............................२५/५/११