Total Pageviews

Thursday, September 30, 2010

शोध...

वळणाऱ्या नजरा टाळतच ती पुढे जात होती
कधी समोर तर कधी पलीकडे पाहत होती
भिरभिरणारी तिची नजर बरंच काही सांगत होती
कदाचित ती कोणालातरी शोधत होती ...

भीती दाटलेली तिच्या नजरेत होती
विखुरलेली बट गालावर रुळत होती
कसल्यातरी ती विचारात होती
कदाचित ती कोणालातरी शोधत होती ...

पुढच्याच वळणावर ती अडखळली होती
त्या अंधाऱ्या पुलाखाली निरखून पाहत होती
बेहोष पडलेली सावली तिच्या ओळखीची होती
कदाचित ती त्यालाच शोधत होती ...

लगबगीने ती त्याच्याकडे वळली होती
मध्येच ओघळणारी आसव पुसत होती
त्या सावलीला आपल्या कुशीत घेत होती
तिची वणवण आता संपली होती ...

हो !! ती त्यालाच शोधत फिरत होती ...

कोमल .......................................३०/९/१०

ती वाट चुकीचीच होती ...

तू दाखवलेली वाट अंधाराची होती
पण विश्वासानेच मी ती धरली होती ...

मार्ग तसा आपला एकचं होता
पण नशिबाचा बेत काहीसा वेगळा होता ...

मनात नसतानाही तुझ्यासोबत तेव्हा हसले होते
कदाचित इथेच नशिबाचे चाक माझे फसले होते ...

दूर पर्यंत सोबत करशील हा विश्वास होता
पण त्या अंधारात तू नकळत दूर जात होता ...

एका वळणावर जेव्हा मी वळून पहिले होते
माझ्या भासाशिवाय दुसरे काहीही दिसले नव्हते ...

ती अस्पष्टशी प्रतिमा कदाचित तुझीच होती
पण आसवांच्या पडद्याआड तीही धुसारशी होत होती ...

आर्त मन माझे तुलाच साद देत होते
पण ते ऐकायला तुझे अस्तित्वच तिथे उरले नव्हते ...

आता थांबवूनही काही उपयोग नव्हता ... तुझी वाट तू निवडली होती
कुणास ठाऊक !! कदाचित माझीच वाट चुकीची होती ...

कोमल ........................................३०/९/१०

खर सांगू ! मी तिथे कुठेच नव्हते ...

तुझ्या आठवणीत दाटताना
मी तुझ्या आसवातही नव्हते
खर सांगू ! मी तिथे कुठेच नव्हते ...

तुझ्या प्रश्नांना सोडवताना
मी तुझ्या विचारातही नव्हते
खर सांगू ! मी तिथे कुठेच नव्हते ...

तुझ्या हृदयाला सांधताना
मी तुझ्या मनातही नव्हते
खर सांगू ! मी तिथे कुठेच नव्हते ...

तुझ्या शब्दांना जुळवताना
मी तुझ्या काव्यातही नव्हते
खर सांगू ! मी तिथे कुठेच नव्हते ...

तुझ्या प्रीतीत गुंतताना
मी तुझ्या एकांतातही नव्हते
खर सांगू ! मी तिथे कुठेच नव्हते ...

तुझ्या सोबत जागताना
मी तुझ्या नजरे समोरही नव्हते
खर सांगू ! मी तिथे कुठेच नव्हते ...

तुझ्या आभाळात चांदणे पांघरताना
मी तुझ्या स्वप्नातही नव्हते
खर सांगू ! मी तिथे कुठेच नव्हते ...

हो !! खरचं मी तिथे कुठेच नव्हते ...

कोमल ...........................................३०/९/१०

Thursday, September 23, 2010

आजकाल मला स्वप्नच पडत नाही...

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखा हसत नाही
उगाच हुंदक्यांच्या आवाजाने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखा बोलत नाही
उगाच ओळखीच्या हाकेने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखा चिडवत नाही
उगाच कसल्यातरी भासाने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखा जवळ येत नाही
उगाच मी दचकल्याने मला जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू वळून पाहत नाही
उगाच तुला थांबवताना मला जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही .........

कोमल ................................२४/९/१०

Sunday, September 19, 2010

सारे काही तुझेच होते .....

हातात हात घेउनी चाललेही मीच होते
स्वप्न तुझी ...... आठवण तुझी
सारे काही तुझेच होते .....

अनपेक्षित वळणावर थांबलेही मीच होते
प्रतीक्षा तुझी ...... वेळ तुझी
सारे काही तुझेच होते .....

येणाऱ्या संकटांना थोपवतही मीच होते
वादळे तुझी ...... वावटळ तुझी
सारे काही तुझेच होते .....

चुकलेल्या मार्गाला बदलतही मीच होते
वाट तुझी ...........हार तुझी
सारे काही तुझेच होते .....

कोसळणाऱ्या नभात भिजणारीही मीच होते
आसव तुझी ........ जखम तुझी
सारे काही तुझेच होते .....

कोमल ................................२०/९/१०

मी बेचिराख जाहिले....

भरलेल्या पेल्यात दुःखाला बुडवले
उध्वस्थ स्वप्नांना आज फाडून टाकले

जळणाऱ्या धुरात स्वतःलाच जाळले
कोण होतो अन काय झालो हे मलाच न कळले

आठवांच्या वणव्याला मी तिथेच शमवले
कोसळणाऱ्या नभात मनाला भिजवले

मिटलेल्या पापण्यात आसवांना गोठले
का तरी हे वादळ माझ्या पुढे उभे ठाकले

मी तर नेहमीच संकटांना परतवले
तरीही आज मी बेचिराख जाहिले

कोमल ...............................२०/९/१०

Sunday, September 12, 2010

गर्दीत मी एकटी ( विडंबन )

गर्दीत मी एकटी
नेहमीची वाट चुकलेली
तशी आहेच मी
थोडी जास्तच वेंधळी.........

ओळखीचे चेहरेही
लक्षात राहत नाही
काय करू स्मरणशक्ती
माझी झाली आहे कमी .........

अंधार रोजचा तरीही
आजच मी घाबरले
अहो चुकून मी आज
torch च घरी विसरले .....

आवाज रोजचा तरीही
आज मी जरा जास्तच गोंधळतेय
एकाच वेळी एवढा गोंधळ
आज पहिल्यांदाच तर ऐकतेय

वेदना रोजची तरीही
आज खूप होते कळवळत
आठवण झाली बरेच दिवस
मी औषध होते टाळत .....

आठवणी रोजच्या तरीही
आज फार हसले मी
माझ्याच वेंधळेपणाने
बऱ्याचदा फसले मी .....

कोमल .........................................१२/९/१०

Saturday, September 11, 2010

तू असाच.....

तू असाच चालत राहा
न थांबता न अडखळता
अंधार दूर सारत
मी हि असेन तिथेच कुठेतरी ...

तू असाच हसत राहा
प्रसन्नतेने मोकळेपणाने
चंद्रासोबत खुलताना
मी हि असेन तिथेच कुठेतरी ...

तू असाच गात राहा
बेधुंदपणे स्वछंदपणे
डोलणाऱ्या फुलांसोबत
मी हि असेन तिथेच कुठेतरी ...

तू असाच पुढे जात राहा
मागे वळून न पाहता
वाटेतले काटे काढत
मी हि असेन तिथेच कुठेतरी ...

कोमल ........................१२/९/१०