Total Pageviews

Saturday, January 8, 2011

द्वंद्व ...

द्वंद्व ...
शब्दांचे शब्दांशी ...
मौनात कोंडलेल्या अस्वस्थ श्वासांशी ...

द्वंद्व ...
स्पंदनाचे स्पंदनानशी ...
हळुवार जपलेल्या नाजूक भावनांशी ...

द्वंद्व ...
आठवांचे आठवांशी ...
मिटलेल्या पापण्यातल्या ओलसरपणाशी ...

द्वंद्व ...
स्वप्नांचे स्वप्नांशी ...
काही निसटत्या हळव्या क्षणांशी ...

द्वंद्व ...
मनाचे मनाशी ...
मनात उठणाऱ्या भावनांच्या कल्लोळाशी ...

कोमल .............................९/१/११

Wednesday, January 5, 2011

असेच काहीसे होते...

अनोळखी गर्दीत जसे ओळखीचे भेटावे
गोंधळलेल्या चेहऱ्यावर नवे हास्य फुलावे
असेच काहीसे होते मनाचे ....

निरभ्र आभाळात अचानक मळभ दाटावे
मिटलेल्या पापण्यांनी काहीतरी लपवावे
असेच काहीसे होते आठवांचे ....

अबोल भावनांना कुणीतरी शब्दात गुंफावे
मौनाला कुणीतरी समजून घ्यावे
असेच काहीसे होते आसवांचे ....

मनातल्या वादळाला उगाच थोपवावे
उचंबळणार्या विचारांना जणू धरून ठेवावे
असेच काहीसे होते निरुत्तर प्रश्नांचे ....

एकांतात उगाच विचारात पडावे
हरवलेल्या गर्दीत स्वतःलाच शोधावे
असेच काहीसे होते नेहमीच माझे ....

कोमल ...................................५/१/११