Total Pageviews

Tuesday, November 30, 2010

का कुणास ठाऊक ...

हळव्या क्षण माझ्या
तुझी याद येते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!

ओल्या पापण्यात माझ्या
तुझे स्वप्न विरते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!

हळुवार स्पर्शात माझ्या
तुझे स्पंदन जाणवते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!

उगाच मौनात माझ्या
तुझे शब्द रेखाटते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!

सांडलेल्या ओंजळीतून माझ्या
तुझी आठवण वेचते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!

थांबलेल्या क्षणातून माझ्या
तुझा क्षण वगळते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!

का कुणास ठाऊक ...

कोमल ................................३०/११/१०

Tuesday, November 23, 2010

सखे! फक्त दे एकदा हात हातात माझ्या

जपेन मोती मी आसवातील तुझ्या
वाचेन मौन मी नयनात तुझ्या
सोड हा खेळ शब्दांचा तुझ्या
सखे! फक्त दे एकदा हात हातात माझ्या...

सारेन मी दूर अंधार जीवनातील तुझ्या
वेचीन काटे मी वाटेतील तुझ्या
सोड हा अबोला ओठांचा तुझ्या
सखे! फक्त दे एकदा हात हातात माझ्या...

माळीन मोगरा मी वेणीत तुझ्या
हर्षेल चांदणेही हास्याने तुझ्या
विरघळुदे तेव्हा मला मिठीत तुझ्या
सखे! फक्त दे एकदा हात हातात माझ्या...

गुंफेन शब्दफुले मी आठवात तुझ्या
गाईन गीत मी विरहात तुझ्या
का ग छळंसी या वेड्याला तुझ्या
सखे! फक्त दे एकदा हात हातात माझ्या...


कोमल ..............................२३/११/१०

Thursday, November 18, 2010

गातील गीत वारे...

गातील गीत वारे
तव स्पर्शाने गंधाळलेले...

गातील वेदनाही
तव आसवाने भिजलेले...

गातील शब्द वेडे
तव मौनात अडकलेले...

गातील स्पर्श हळवे
तव बंधनात गुंफलेले...

गातील श्वास सारे
तव मनात गुंतलेले...

गातील मन बावरे
तव आठवात हरवलेले...

कोमल ....................१८/११/१०

सांगेन मी केव्हातरी...

गुपित माझ्या मनाचे
सांगेन मी केव्हातरी
जे दडले मौनात ते शब्दात
मांडेन मी केव्हातरी...

दाटलेल्या आसवांचा अर्थ
सांगेन मी केव्हातरी
अस्वस्थ श्वासाची घुसमट
जाणवेल तुला केव्हातरी...

तुझ्या सावलीचा आभास
सांगेन मी केव्हातरी
अंधारातला माझा भास
होईल तुला केव्हातरी...

जपलेल्या क्षणांचा हिशोब
सांगेन मी केव्हातरी
ओंजळीतल्या आसवांना
सांडेन मी केव्हातरी...

अबोल वेदना मनातील
सांगेन मी केव्हातरी
मुकी प्रीत माझी
कळेल तुला केव्हातरी...

कोमल .................................१८/११/१०

Friday, November 12, 2010

मज जाणवून गेले ...

गंधाळलेले वारे
सांगून काही गेले
स्पर्श तुझ्या मनाचा
मज जाणवून गेले ...

मुके शब्द वेडे
मौनात बोलून गेले
उरी दडलेल्या भावना
मज जाणवून गेले ...

गुंतलेले श्वास
वेड लावून गेले
हलकेच तुझी स्पंदने
मज जाणवून गेले ...

वाटेतले चांदणेही
वाट उजळून गेले
स्मित तुझ्या चेहऱ्यावरचे
मज जाणवून गेले ...

कोमल ..........................१२/११/१०

शापित...

शापित वाट आज झाली का कळेना
अंधार दाटला मनी का दूर हा सरेना...

गंधित पुष्पाचा सुगंधही का दरवळेना
का वेचली ती सुमने मज आता कळेना...

गातात वेदनाही पण जखम का भरेना
संवेदना असूनही हा भाव का दाटेना...

आधार चांदण्याचा तरी एकांत का संपेना
तो चंद्र मावळला तरी का अंधार हा मिटेना...

पाहून वाट त्याची ही रात का सरेना
होते उभे सामोरी तरीही विरह का कळेना...

ज्योत सोबती तरीही का दिशा सापडेना
जाणते नियती शापित तरी खंत का कळेना...

कोमल ...........................१२/११/१०

Monday, November 8, 2010

अन... माझ्याच पापण्यांना आज आसवांचा भार झाला

क्षणिक नात्यांचा सहवास फार झाला
जुळलेल्या नाजूक बंधाचा गुंता गुंतत गेला
अन... माझ्याच पापण्यांना आज आसवांचा भार झाला

मनी उठलेल्या वादळाचा धुरळा फार झाला
सावरलेल्या मनाचा क्षणभर तोल गेला
अन... माझ्याच पापण्यांना आज आसवांचा भार झाला

जुन्या आठवांचा आज गुंता फार झाला
नकळत आज नभ नयनात दाटून गेला
अन... माझ्याच पापण्यांना आज आसवांचा भार झाला

वळले जराशी मी पण अंधार फार झाला
कळले न तुला कधीही आता उशीर झाला
अन... माझ्याच पापण्यांना आज आसवांचा भार झाला

कोमल ..........................८/११/१०

उरतील फक्त आठवणी...

उरतील फक्त आठवणी त्या सांजवेळेची
तुझी ...माझी अन त्या हळव्या क्षणांची...

उरेल खुण त्या तुटलेल्या स्वप्नांची
कधी हातात गुंफलेल्या नाजूक बंधनाची...

पुसशील हलकेच कड पापणीची
जाणवेल तुलाही खुण कोरड्या आसवांची...

विरेल कधीतरी हि गाठ भावनांची
लपवशील मग हि सर हळवी पावसाची...

सांग !! तरी तुटतील का नाती आपल्या मनांची
विसरशील का कधी माझी प्रीत अबोल शब्दांची ?

कोमल ...............................८/११/१०

Thursday, November 4, 2010

क्षणभंगुर ...

शून्यातून उभारलेले जग क्षणात शून्यात मिसळते
एका क्षणात आयुष्य जेव्हा क्षणभंगुर ठरते ...

सोबत सात जन्माची जेव्हा अर्ध्या वाटेतच विरते
एकदाही वळून न पाहता सावलीही निघून जाते ...

एकत्र घालवलेले क्षण मन हेलावून टाकते
त्यांच्या सोबत हसताना तिची आठवण रडवून जाते ...

सांगू कुणा ? त्या देवालाही तुझी गरज भासते
अन मज पामराला हि शिक्षा जन्मभर लाभते ...

सप्तपदीचे वचन ती ज्योत क्षणात मालवून जाते
अन मला हा एकांत जन्मभर सोबत देऊन जाते ...

आज तुझी आठवण मला फार छळतेय ग !!
बघ जमल तर परत ये नाहीतर मलाही सोबत घे ...

कोमल ....................४/११/१०