Total Pageviews

Sunday, December 26, 2010

वाद ...

संपले सारे होते कधीचे
फक्त पंचनामा उरला
चूक कोणाची? चर्चा रंगली
कोण बरोबर? वाद जुंपला

आधीच होते सांगितले
तरी मार्ग कसा चुकला ?
जळजळीत प्रश्न असा त्यांनी
आमच्या तोंडावर फेकला

मुठीतल्या आभाळासोबत
विश्वासच जेव्हा संपला
मग उगाच का उत्तर देऊ
मी त्यांच्या व्यर्थ प्रश्नाला

अनायसे जाणवून गेले
न उरला अर्थ कशाला
का भांडतो, वाद घालतो
उगा त्रास देतो जीवाला

भावनांचा खेळ सारा
नियतीशी होता जुंपला
कोण जिंकला !! कोण हरला !!
वाद त्यात फुकाचा रंगला

कोमल ............................२६/१२/१०

Sunday, December 12, 2010

तुझ्या आठवणी ......

कितीही ठरवलं तरी ती रोजच येते
अगदी न सांगता ....अनाहूतपणे

त्या अवखळ वाऱ्यासारखी
कधी सुखावते तर.... कधी दुखावते

नकळत माझ्या समोर येऊन थांबते
अगदी ....ध्यानीमनी नसताना

टाळल्या जरी त्या जुन्या वाटा
तरी ती येते ....अगदी समोरच माझ्या

काय करू!! सांग रे आता !!
कस समजावू ?....कशा टाळू ?
'
'
'
तुझ्या आठवणी .........

कोमल ......................१२/१२/१०

आठवतात का रे तुलाही ?

पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा सुगंध ..
मन ....वेडावणारा

त्यात वाफाळणाऱ्या चहाचा अन कांदाभाजीचा सुगंध ..
जुन्या ...आठवणी ताज्या करणारा

समुद्रावरच्या खाऱ्या वाऱ्याचा सुगंध ..
पुन्हा एकदा ...तुझी आठवण करून देणारा

मनात साठलेल्या तुझ्या कित्येक आठवणींचा सुगंध ..
अन त्यात हरवलेल्या माझ्या मनाचा सुगंध ..

आठवतात का रे तुलाही ?.....आपल्या आठवणी

कोमल ..............................१२/१२/१०

आठवणीतले सुगंध ...

पहाटेच्या गार वाऱ्याचा सुगंध ..
अगदी ...शहारून टाकणारा

दारात पडलेल्या प्राजक्ताचा सुगंध ...
अंगण .....भरून टाकणारा

जळणाऱ्या चुलीचा सुगंध ..
भूक ..... चाळवणारा

सारवलेल्या अंगणाचा सुगंध ...
आजीची .....आठवण करून देणारा

दिवाळीच्या उटण्याचा सुगंध ..
श्वासात .....भरून राहिलेला

देवघरातल्या उदबत्तीचा सुगंध ..
सगळ्या श्लोकांची ....आठवण करून देणारा

असेच काही जुने क्षण
हरवलेल्या गोष्टींची...पुन्हा आठवण करून देणारे

कोमल ..................१२/१२/१०

Wednesday, December 8, 2010

प्रीत अशी..

गंधित भावनांना साद कुणीतरी द्यावी
स्पर्शाने त्याच्या मी मोहरून जावी ...

चाहुलीने नकळत बावरून जावी
उगाच शब्दांमध्ये गुंतून पडावी ...

अबोल नजरच मग हळूच बोलावी
हलकेच मनीचे गुपित खोलावी ...

चांदण्यांच्या साक्षीने रात बहरावी
हळुवार श्वासाने श्वास गुंफीत जावी ...

मोगऱ्याच्या गंधाने मी गंधित व्हावी
धुंद त्या मिठीत मी हरवून जावी ...

प्रीत अशी कि नजर लागावी
मोरपंखाप्रमाणे ती हळुवार फुलावी ...

कोमल ....................................८/१२/१०

Wednesday, December 1, 2010

शोधते मी ...

शोधते मी ...स्वतःलाच
ओसंडून वाहणाऱ्या गर्दीमध्ये
कधी कुणाच्या हास्यात
तर कधी आसवांमध्ये

शोधते मी ...स्वतःलाच
शांत एकाकी रस्त्यामध्ये
कधी उमलणाऱ्या रातराणीत
तर कधी कोमेजलेल्या कळीमध्ये

शोधते मी ...स्वतःलाच
जुन्या हळव्या क्षणांमध्ये
कधी भिजलेल्या पापण्यात
तर कधी निसटत्या आठवणींमध्ये

शोधते मी ...स्वतःलाच
धूसर प्रकाशामध्ये
कधी चांदण्यांच्या गर्दीत
तर कधी रिकाम्या आभाळामध्ये

अजूनही शोधते मी... स्वतःलाच

कोमल ...........................२/१२/१०