Total Pageviews

Sunday, September 11, 2011

तोच तो एक भाव ...

तोच तो एक भाव वाटतो नभी जसा
तोच एक वेडा भाव दाटतो मनी असा
तोच शब्द तोच अर्थ साठतो उरी जसा
तीच आस तोच भास करतो वेडापिसा

धुंद गीत धुंद प्रीत अशीच वेडी भावना
बेधुंद या मनातली धुंद वेडी याचना
तोच गंध तोच बंध सदैव हीच कामना
तेच सूर सदा जुळावे एक वेडी योजना

तोच साद तोच आवाज ओळखीचा वाटला
तोच स्पर्श तोच श्वास मनात होता साठला
तोच एक मृदुगंध जरी उरी भरून राहिला
तीच मी तोच तो अन एकांत अनोळखी वाटला

कोमल .....................................११/९/११

Sunday, August 28, 2011

आर्तता ...


शरीराने जरी नसे मी खंबीर
तरी मनाने कमजोर मज समजू नका ..

रणांगणात जरी नसे मी धाडसी
तरी समाजात दुबळी मज समजू नका ..

धनाने जरी नसे मी श्रीमंत
तरी मनाने लाचार मज समजू नका ..

शब्दांनी जरी नसे मी प्रगल्भ
तरी मौनाने शांत मज समजू नका ..

सत्पुरुषाप्रमाणे जरी नसे मी दैवी
तरी माझ्यातला माणूस विसरू नका ..

कोमल .............................२८/८/११

Saturday, August 13, 2011

किलबिलाट...


अचानक समोरच्या झाडावर
चुळबूळ जाणवली
त्या घरट्यात पाखरांची
आई परतली होती ...

ती नकळत कुणाचीतरी
आठवण करून गेली
त्या चिमण्या किलबिलाटाने
शांतता व्यापून टाकली होती ...

गेल्या पावसाळ्यात मी हि आईच्या
मागे असाच किलबिलाट करत होते
अन या पावसाळ्यात मी एकटीच
समोरचा किलबिलाट पाहत होते ...

कोमल .........................१३/८/११

ती अन मी


ती स्वर्गातील गोंडस परी
अन मी दगड मातीतला ...

ती उषेचे रंग नवे
अन मी अंधार डोहातला ...

ती हलकीशी सर
अन मी पाऊस वळवातला ...

ती गोड खुललेली कळी
अन मी काटा पानातला ...

ती श्रावणातला निसर्ग
अन मी निष्पर्ण ग्रीष्मातला ...

ती झुळूक सुखावणारी
अन मी वादळ मनातला ...

कोमल ...................१३/८/११

Tuesday, August 9, 2011

कधी वाटे ....

कधी हळुवार कधी रुक्ष तू
कधी शांत कधी चंचल तू
कधी मिटलेल्या पानातील
एक नाजुकशी कळी तू ....

कधी रात्र कधी अंधार तू
कधी भास कधी आभास तू
कधी रिक्त आभाळातील
एक अंधुक चांदणे तू ....

कधी जवळ कधी दूर तू
कधी किनारा कधी सागर तू
कधी नकळत येणारी
हलकीशी झुळूक तू ....

कधी प्राजक्त कधी चाफा तू
कधी पानगळ कधी हिरवळ तू
कधी माझ्याच ओंजळीत
एक दडलेला मोती तू ...

कोमल ..................८/८/११

Tuesday, May 24, 2011

तो असाच येतो ...

तो असाच येतो ...
अन दाटून जातो ...
भरलेल्या पापण्यांना सामावून घेतो ...

तो असाच येतो ...
क्षणात बरसून जातो ...
मृदुगंध प्रीतीचा दरवळून जातो ...

तो असाच येतो ...
अन चिंब भिजवतो ...
कोरड्या मनाला सुखावून जातो ...

तो असाच येतो ...
अन वेडावून जातो ...
जुन्या आठवणींना उजळवून जातो ...

तोच तो पाऊस अन त्याच्या आठवणी ...

कोमल .............................२५/५/११

Wednesday, May 18, 2011

एक नात ..बिननावच

काही नाती क्षणांची... काही काळाची

काही नाती रक्ताची... काही बिनरक्ताची

काही मैत्रीची...काही प्रेमाची

काही मनांनी जोडलेली... काही नशिबाने बांधलेली

काही हवीहवीशी वाटणारी... काही नकोशी झालेली

असच असत एक नात ....एका वळणावर भेटलेलं

सहजच जुळलेलं ...मनाशी जोडलेलं

खूप जवळच वाटणार... तरीही दूर राहिलेलं

एक नात बिननावाच ...काळाच्या ओघात पुसट होणार

अन मनात कायम घर करून जाणार ...


कोमल ............................१८/५/११

Sunday, April 24, 2011

ती अन ...

ती अन तिचा गंध
मज उगाच वेडावतो ...
कदाचित तिच्यापेक्षा जास्त

ती अन तिचा स्वर
मज उगाच खुणावतो ...
कदाचित ती नसताना जास्त

ती अन तिचा स्पर्श
मज उगाच सुखावतो ...
कदाचित तिच्या नकळत जास्त

ती अन तीच हसण
मज उगाच हसवतो ...
कदाचित तिला आठवून जास्त

ती अन फक्त तीच
मज उगाच भास होतो ...
कदाचित माझ्याही नकळत जास्त

कोमल .............................२४/४/११

Thursday, March 17, 2011

ती ....

मौन तिचे कधी कळले नाही
शब्द सुद्धा कधी वळलेच नाही

स्वप्न तिचे कधी जाणलेच नाही
झेप सुद्धा कधी जाणवलीच नाही

आभाळ तीच कधी मोजलच नाही
वितभर सुद्धा कधी मापल नाही

अस्तित्व तिचे कधी शोधले नाही
सावली शिवाय कधी सापडलेच नाही

मन तिचे कधी जपले नाही
तिनेही कधी काही मागितलेच नाही

कोमल ........................................१७/३/११

Sunday, March 6, 2011

मिठी ...

चांदण्यांच्या मिठीत चंद्र विसावतो
कधी आसमंत कधी अंधार लाजतो

फुलांच्या मिठीत सुगंध दरवळतो
कधी पान तर कधी काटा शहारून जातो

आईच्या मिठीत ओलावा असतो
कधी मायेचा कधी काळजीचा झरा पाझरतो

आठवांच्या मिठीत क्षण सामावतो
कधी आसवात तर कधी हास्यात सांडतो

गर्दीच्या मिठीत गांगरून जातो
कधी स्वतःपासून कधी लोकांपासून अलिप्त राहतो

आयुष्याच्या मिठीत सौख्य शोधतो
कधी समाधान तर कधी अस्तित्व हरवतो

कोमल .............................................६/३/११

Monday, February 28, 2011

सुख मानून पहावे...

कधी हसून तर कधी रडून पहावे
कधी आसवात कधी आठवात दाटून पहावे

दृश्य अदृश्य गोष्टी पडताळून पहावे
खरे किती खोटे किती हे जाणून पहावे

कुणाच्या मनात नाहीतर आठवात साचून पहावे
कधी मौनातून कधी पापण्यातून सांडून पहावे

स्वार्थ निस्वर्था पलीकडे कधीतरी देऊन पहावे
उगाचच त्यातलेच थोडेसे मागून पहावे

गर्दीतही कधीतरी अलिप्त राहून पहावे
क्षणभर कधीतरी अदृश्य होऊन पहावे

डोंगाराएवढ्या दुःखावर हसून पहावे
ओंजळभर प्रेमातही सुख मानून पहावे

कोमल .......................................................१/३/११

Sunday, February 27, 2011

नकळत सांजवेळी ...

नकळत सांजवेळी कुणीतरी येऊन जाते
मनाला माझ्या अस्वस्थ करून जाते ...

कुणीतरी ओळखीचे असावे.. उगाच वाटून जाते
मनात विचारांचे असंख्य वादळ घोंगावून जाते ...

मनाचे खेळच असावे असे उगाच वाटून जाते
कोणीतरी असल्याचे आभास जाणवून जाते ...

अस्पष्ट... धूसर... काहीस आठवून जाते
मनावरचे पडदे जेव्हा मी दूर सारून जाते

असेच सांजवेळी कुणीतरी येऊन जाते
नकळत आठवांचे आभाळ पुन्हा दाटून जाते ...

कोमल ...........................................................२७/२/११

Friday, February 25, 2011

एक क्षण ...

एक क्षण पुरेसा असतो ...
मनाशी संवाद साधण्यासाठी
कधी एक क्षण अपुरा पडतो ...
आपली बाजू मांडण्यासाठी

एक क्षण भरून येतो ...
मन मोकळ करण्यासाठी
कधी एक क्षण निशब्द होतो ...
मौनाचा अर्थ शोधण्यासाठी

एक क्षण पुरून उरतो ...
आपला आनंद वाटण्यासाठी
कधी एक क्षण कमी पडतो ...
आठवणीत दाटण्यासाठी

एक क्षण खोटा ठरतो ...
आपला विश्वास जपण्यासाठी
कधी एक क्षण अस्वस्थ करतो ...
आपलंच मन जाणण्यासाठी

कोमल ..................................२६/२/११

Saturday, February 19, 2011

बांडगुळ...

मनावर वाढणार
विचारांनी गुरफटणार
आपल्याच रक्तावर पोसणार
काहीस अस्वथ करणार
स्वप्नांना नष्ट करणार
नशिबाला दोष देणार
समाजाच ओझ लादणार
एक बांडगुळ....
आपली वाढ खुंटवणार

कोमल ...........................२०/२/११

Wednesday, February 9, 2011

सगळेच नियम आहेत बदलले...

लोक सोयीनुसार आहेत वागू लागले
पैसा-जात पाहून प्रेमात पडू लागले
जो वेळ देईल तोच जोडीदार शोधू लागले
आजकाल सगळेच नियम आहेत बदलले

कामापुरते सारेच गोड बोलू लागले
जो तो आपल्या प्रेमाचे हिशेब मांडू लागले
मी दिले न तू लुबाडलेस हेच सांगू लागले
आजकाल सगळेच नियम आहेत बदलले

प्रेम माझेच होते खरे तिनेच मला फसवले
जाताना दारूच्या नशेत मला पार बुडवले
स्वतःच आपल्या प्रेमाचा अपमान करू लागले
आजकाल सगळेच नियम आहेत बदलले

कसे लोक नवीन पळवाटा शोधू लागले
नवीन कारणाने स्वतःचा बचाव करू लागले
तुझ माझ करत आयुष्य हरवू आहेत लागले
आजकाल सगळेच नियम आहेत बदलले

दोन घडीचा डाव मोडून नवीन वाटा शोधू लागले
गोड हळव्या प्रेमाचा नव्याने खेळ मांडू लागले
अन क्षणभर प्रेमासाठी valentine day साजरा करू लागले
आजकाल सगळेच नियम आहेत बदलले

खरचं !! लोक सोयीनुसार आहेत वागू लागले

कोमल .................................१०/२/११

Sunday, February 6, 2011

तुझा दोष नाही...

गाणे कसे गाऊ गाण्यात सूर नाही
शब्द फितूर झाले मौनाला अर्थ नाही...

चांदण्यांची गर्दी झाली आभाळ रिक्त नाही
नयनात दाटला पाऊस आठवांना जागा नाही...

पुरे झाली माया माझी झोळी मोठी नाही
फाटक्या झोळीला माझ्या कुठे ठिगळच नाही...

ओंजळीत जपलेले क्षण धूसर झाले नाही
टाळते ते गंध वेडे उगाच लोभ बरा नाही...

जुन्या वळणांवर आताशा उगाच रेंगाळत नाही
नशीबच शापित माझे येथे तुझा दोष नाही...


कोमल ६/२/११

Saturday, January 8, 2011

द्वंद्व ...

द्वंद्व ...
शब्दांचे शब्दांशी ...
मौनात कोंडलेल्या अस्वस्थ श्वासांशी ...

द्वंद्व ...
स्पंदनाचे स्पंदनानशी ...
हळुवार जपलेल्या नाजूक भावनांशी ...

द्वंद्व ...
आठवांचे आठवांशी ...
मिटलेल्या पापण्यातल्या ओलसरपणाशी ...

द्वंद्व ...
स्वप्नांचे स्वप्नांशी ...
काही निसटत्या हळव्या क्षणांशी ...

द्वंद्व ...
मनाचे मनाशी ...
मनात उठणाऱ्या भावनांच्या कल्लोळाशी ...

कोमल .............................९/१/११

Wednesday, January 5, 2011

असेच काहीसे होते...

अनोळखी गर्दीत जसे ओळखीचे भेटावे
गोंधळलेल्या चेहऱ्यावर नवे हास्य फुलावे
असेच काहीसे होते मनाचे ....

निरभ्र आभाळात अचानक मळभ दाटावे
मिटलेल्या पापण्यांनी काहीतरी लपवावे
असेच काहीसे होते आठवांचे ....

अबोल भावनांना कुणीतरी शब्दात गुंफावे
मौनाला कुणीतरी समजून घ्यावे
असेच काहीसे होते आसवांचे ....

मनातल्या वादळाला उगाच थोपवावे
उचंबळणार्या विचारांना जणू धरून ठेवावे
असेच काहीसे होते निरुत्तर प्रश्नांचे ....

एकांतात उगाच विचारात पडावे
हरवलेल्या गर्दीत स्वतःलाच शोधावे
असेच काहीसे होते नेहमीच माझे ....

कोमल ...................................५/१/११