Total Pageviews

Wednesday, May 26, 2010

लक्तराच जगण ...

नको देऊस देवा
असं लक्तराच जगण ...

एका तुकड्यासाठी
पोटाला चिमटे काढण
कोरड्या मातीला
घामान भिजवण .....

पोटच्या पोराला
भिकेला लावण
अन पोटासाठी
त्यांचाच वापर करणं....

जन्मली जर कधी मुलगी
तर आधीच तिचा गळा घोटण
नाहीतर तिलाच विकून
त्या पैशांवर संसार चालावण....

फाटक्या चोळीसाठी
आक्रोश करणं
अब्रूची लूट
डोळ्यादेखत पाहण ...

कधी दिलसच नाही
तिला समाधानच जगण
कस जमलं नाही तुला
अब्रू तिची वाचवण ....

नशिबातच आहे
असं आयुष्याच्या चादरीला
ठिगळानी जोडण
पुरे हे लाचारीच जगण
निदान आता तरी सुखाच येऊ दे मरण

नको , खरच नको रे देवा !!
हे असं लक्तराच जगण ....

कोमल ..........................२५/५/१०

Monday, May 24, 2010

भरकटलेल मन ...

भरकटलेल मन आज कुठेतरी शांत आहे

अजाणतेपणी केलेल्या चुका सुधारत आहे

टोचलेल्या शब्दांवर उपाय करत आहे

चिघळलेल्या जखमांवर औषध शोधत आहे

तुटलेल्या मनाला जोडण्याचा प्रयत्न करत आहे

भिजलेल्या नयनांना कोरड करत आहे

अस्वस्थ विचारांना आवरत आहे

मूक शब्दांना पाझर फोडत आहे

कोलमडलेल्या विश्वासाला सावरत आहे

हरवलेली वाट पुन्हा नव्याने शोधत आहे

कोमल ...............२५/५/१०

अर्थहीन ...

डोळे तर दिलेस ....
मग स्वप्नही द्यायची होतीस ना...

मन तर दिलेस .....
मग भावनाही द्यायच्या होत्यास ना ....

वाचा तर दिलीस ...
मग शब्दही द्यायचे होतेस ना ....

माणस तर दिलीस ...
मग त्यांना आपलेपणाही शिकवायचा होतास ना....

हृदय तर दिलेस ...
मग त्याला प्रेमात भिजायलाही शिकवायचं होतास ना ....

आठवणी तर दिल्यास ....
मग त्या विसरायलाही शिकवायचं होतास ना .....

आयुष्य तर दिलेस ....
मग त्या नुसत्याच जगण्याला अर्थही द्यायचा होतास ना...

हे देवा , आजपर्यंत मागण्या तर खूप केल्या ...
कधीतरी त्या पूर्णही करायच्या होत्यास ना ....

कोमल ......................२४/५/१०

Friday, May 21, 2010

देणार आहेस का मला ...

देणार आहेस का मला ...
माझे हरवलेले क्षण .....
माझे लोपलेले हास्य ....
माझे गोठलेले अश्रू ....
माझ्या गोड आठवणी ....
माझा जपलेला विश्वास....
माझी निखळ मैत्री ....
माझे निस्वार्थ प्रेम .....
माझे हरवलेले अस्तित्व ....
सांग ना, जमणार आहे का तुला
माझे सर्वस्व परत करायला ....

कोमल .................२२/५/१०

कधी तुझ्या....

कधी तुझ्या हसण्याने
आसमंत उजळते

कधी तुझ्या आसवांनी
मनही भिजते

कधी तुझ्या स्वरांनी
भानही हरपते

कधी तुझ्या स्पर्शांनी
ओढ वाढते

कधी तुझ्या विचारांनी
मनही नकळत गुंतते

सखे , कधी तुझ्या फक्त अस्तित्वाने
माझेही अस्तित्व जाणवते

कोमल ...............२१/५/१०

Tuesday, May 18, 2010

का उगाच अजूनही घुटमळत आहे ...

माझीया मनास समजावुनी पाहे
का उगाच तू घुटमळती अजुनी
का उगाच वाट पाहे ...

ठाऊक आहे तुजला का
अजून दुर्लक्ष करसी
तुला उगाच हे कसले भास होत आहे
का उगाच अजूनही घुटमळत आहे ...

उगाच शंका नानाविध
नसते विचार भरमसाठ
का मनाला असे कोंडत आहे
का उगाच अजूनही घुटमळत आहे ...

पाझर येऊ देत आज मनाला
भिजवून टाक शब्दात त्याला
का उगाच मनाला कोरडे करत आहे
का उगाच अजूनही घुटमळत आहे ...

जा जरा सामोरे तू त्याला
अडव आता इथेच मनाला
का तो वेड्यासारखा पळत आहे ...
का उगाच अजूनही घुटमळत आहे

कोमल .................१९/५/१०

मनास माझ्या........

मनास माझ्या कळेना का असे झाले
उगाच त्याला एकटे रहावेसे वाटले
गोंधळातही शांततेचे स्वर आले
आपलं बोलणारेहि आज अनोळखी वाटले
सगळेच चेहरे फक्त भासासारखेच जाणवले
आजूबाजूला फिरणाऱ्या देहांचेही अस्तित्व नाही उरले
आणि त्यात माझ्याच अस्तित्वाची जागा शोधत फिरले
क्षणभर एक सत्य पटले
उगाच कशाला कोणामध्ये हरवावे
एक दिवस जेव्हा तोही आपले अस्तित्वच नाकारेल
तेव्हा नंतर तुटण्यापेक्षा आजच स्वतःला सांभाळावे
म्हणून कदाचित माझ्या मनाला आज एकटे रहावेसे वाटले

कोमल .......................१९/५/१०

Friday, May 14, 2010

कधीतरी वाटत ...कोणीतरी असावं

कधीतरी वाटत ...कोणीतरी असावं
माझ्या मनाला माझ्याहीपेक्षा जास्त जाणणार ...

कधीतरी वाटत ...कोणीतरी असावं
मी न सांगता त्याला माझे मौन कळावं

कधीतरी वाटत ...कोणीतरी असावं
गरजेच्या वेळी धावून यावं

कधीतरी वाटत ...कोणीतरी असावं
माझ्या अश्रूंची किंमत जाणणार ....

कधीतरी वाटत ...कोणीतरी असावं
माझ्या एका हास्यासाठी तळमळणारं

कधीतरी वाटत ...कोणीतरी असावं
माझ्याहीपेक्षा जीवापाड प्रेम करणार

कधीतरी वाटत ...कोणीतरी असावं
माझ्या स्वप्नांना माझ्याच सारखं जपणार

कधीतरी वाटत ...कोणीतरी असावं
मी न मागता मला सर्वस्व देणार

कोमल .....................१४/५/१०

उगाच कुणीतरी .......

उगाच कुणीतरी .......
कधीतरी नकळत येते
अन मनाची तार छेडून जाते
उगाच कुणीतरी .......
आपलंस वाटते
अन कोरड्या मनालाही पाझर फोडते
उगाच कुणीतरी .......
मनातलं बोलते
अन अचानक आपल्याला कोड्यात टाकते
उगाच कुणीतरी .......
अचानक आठवते
अन नकळत डोळ्यात पाणी आणते
उगाच कुणीतरी .......
विचारात रेंगाळते
अन मनात नसतानाही विचारात पाडते
उगाच कुणीतरी .......
खूप परक वाटते
अन आपल्यापासून खूप दूर जाते

कोमल ...............१४/५/१०

Monday, May 10, 2010

खूप काही बोलायचं होत...

खूप काही बोलायचं होत
पण आता मी नाही बोलणार
ओठांवर रेंगाळणारे शब्द तसेच ठेवणार
मनातल गुपित मनातच साठवणार

खूप काही बोलायचं होत
पण आता मी काही नाही सांगणार
कितीही विचारलं तरी समोरच्याला निरुत्तर करणार
अन कोड्यातही नाही बोलणार

खूप काही बोलायचं होत
पण आता सगळच आहे टाळणार
काहीही विचारलं तरी फक्तच हसणार
अन शब्द माझे डोळ्यातच कोंडून ठेवणार

कोमल .................११/५/१०

Saturday, May 8, 2010

श्वास....

श्वासांनीच सांगितले कि
श्वास बनावा तुझा ....
म्हणूनच मी मिसळला
श्वास तुझ्या श्वासात माझा ...

श्वासांनीच दिलेली साद
माझ्या श्वासांनी ऐकली ...
अन मग क्षणभरही
मी माझ्या श्वासांसोबत नाही उरली .....

श्वासांच्या नाजूक बंधनात
अडकली मी अशी ...
आता मज उमजत नाही मी
या श्वासांशिवाय बाहेर पडू कशी ....

आवडेल मज तुझ्या श्वासात
श्वास माझे मिसळायला ...
तुला जमेल का माझे
श्वास तितकेच जपायला ....

कोमल ...............७/५/१०

Thursday, May 6, 2010

होईल का हे कधी ?

निसटून गेलेले क्षण पुन्हा येतील का कधी ?
हरवलेले मन मज सापडेल का कधी ?
लोपलेले हास्य असे माझे फुलेल का कधी ?
धुक्यातील वाट मज सापडेल का कधी ?
सुकलेले अश्रू पुन्हा वाहतील का कधी ?
पुसट झालेल्या आठवणी पुन्हा उजळतील का कधी ?
हरवलेला गंध मज मिळेल का कधी ?
डोळे उघडताच समोर दिसशील का कधी ?
शब्द हरवलेले मज सापडतील का कधी ?
मी न सांगताही परतशील का कधी ?

कोमल .......................६/५/१०

काहीतरी हरवलं आहे...

काहीतरी हरवलं आहे
कुणास ठाऊक काय ते ....

कदाचित हास्य असावे ... कुणाला तरी उसने दिलेले
तेव्हाच आजकाल फुल कोमेजलेली असतात

कदाचित अश्रू असावे ... कुणासाठी तरी सांडलेले
तेव्हाच आजकाल सगळ कोरड भासत

कदाचित तो चंद्र असावा .... कुणावर तरी रुसलेला
तेव्हाच आज गडद अंधार आहे दाटत

कदाचित तो पाऊस असावा ... अचानक नाहीसा झालेला
तेव्हाच आजकाल आभाळ भरून नाही येत

कदाचित तो वारा असावा .... बेधुंद वाहणारा
तेव्हाच आजकाल सार झाल आहे शांत

कदाचित माझे शब्द असावे .... कुठेतरी हरवलेले
तेव्हाच आजकाल मला नाही काही सुचत

कदाचित माझ्या आठवणी असतील .... पुसट झालेल्या
तेव्हाच आजकाल मला काही नाही आठवत

कदाचित माझे अस्तित्व असेल ..... हरवलेले
तेव्हाच आजकाल मला माझीच जाणीव नाही राहत

कोमल ...................६/५/१०

Sunday, May 2, 2010

कधी वाटल नव्हत ....


कधी वाटल नव्हत ....
तुझ्या येण्याने
आयुष्य अस बदलून जाईल
जसं ग्रीष्मात आभाळ दाटून येईल

कधी वाटल नव्हत ....
तुझ्या हसण्याने
आयुष्य अस खुलून जाईल
जसं अचानक आभाळ मोकळ होईल

कधी वाटल नव्हत ....
तुझ्या बोलण्याने
आयुष्य अस मोकळ होईल
आजपर्यंत कोंडलेले सगळेच शब्द मोकळे होतील

कधी वाटल नव्हत ....
तुझ्या आवाजाने
आयुष्य असा साद देईल
अचेतन शरीराला अचानक जाग येईल

कधी वाटल नव्हत ....
तुझ्या असण्याने
आयुष्य हे सार्थ होईल
हरवलेल्या माझ्या अस्तित्वाला हि नव्याने अर्थ येईल

कधी वाटल नव्हत ....
तुझ्या जाण्याने
आयुष्य अस गोठून जाईल
माझी सावलीही मला क्षणात सोडून जाईल

कोमल ................३/५/१०

वाटल नव्हत ...


वाटल नव्हत ...
जग इतकं स्वार्थी असतं
गोड बोलून आपल्यालाच खड्यात टाकत

वाटल नव्हत ...
जग इतकं निष्टुर असतं
होरपळलेल्या मनालाही आगीतच जाळत

वाटल नव्हत ...
जग इतकं आंधळ असतं
समोर अन्याय दिसूनही डोळे झाकून घेत

वाटल नव्हत ...
जग इतकं दुर्बल असतं
धडधाकट असूनही अंग चोरून बसत

वाटल नव्हत ...
जग इतकं कोडग असतं
मनावर ओरखडे उठूनही गप्प बसत

कोमल .................३/५/१०

इतकं सोप्प असतं का ?


इतकं सोप्प असतं का ?
कुणाला आपलं बोलण
जीव लावून अस क्षणात सोडून जाण..

इतकं सोप्प असतं का ?
कुणावर प्रेम करणं
आधीच होरपळलेल्या मनाला पुन्हा जिवंत करणं ...

इतकं सोप्प असतं का ?
कुणाला जवळ करणं
मनात नसताना सर्वस्व देण...

इतकं सोप्प असतं का ?
कुणाच मौन जाणण
मनातल्या गुंत्याला हळुवारपणे सोडवण...

इतकं सोप्प असतं का ?
कुणाचे मन जपण
स्वतःला विसरून दुसर्याला जाणण....

इतकं सोप्प असतं का ?
कुणाला सहज दूर करणं
श्वासांनी साद देऊन मग श्वासांनाच दूर लोटण..

कोमल ..........................२/५/१०

Saturday, May 1, 2010

माझ्या मराठी मातीचा सुगंध किती....


माझ्या मराठी मातीचा सुगंध किती
वाजतो हा स्वरमय मृदुंग किती ll

या मातीतच घडलो आम्ही
हिच्या रंगात रंगलो आम्ही
अभिमान आम्हाला या मातीचा किती
माझ्या मराठी मातीचा सुगंध किती ll

निधड्या छातीचे वीर आम्ही
जिंकण्यासाठीच लढतो आम्ही
गर्जतो आज मराठी शूरवीर किती
माझ्या मराठी मातीचा सुगंध किती ll

सळसळता उत्साह आमचा
तळपते रक्त आमचे
बेभान आज झालो किती
माझ्या मराठी मातीचा सुगंध किती ll

समुद्रालाही कोरडे करू
वाऱ्याचीही दिशा बदलू
पहा आज मराठीची शक्ती किती
माझ्या मराठी मातीचा सुगंध किती ll

सगळ्याच क्षेत्रात पुढे आम्ही
आता मागे हटणार नाही आम्ही
पहा मराठीची भरारी किती
माझ्या मराठी मातीचा सुगंध किती ll

कोमल ............................१/५/१०

परतशील का कधी मी न सांगता.....


परतशील का कधी
मी न सांगता
देशील का कधी
मी काहीच न मागता ...

खूप सोप्पं असते रे
नुसतंच बोलण
पण येईल का तुला
ते वचन कधी जपता ...

शब्दही थकले माझे
ते हि फितूर झाले
कळेल का तुला
मी काही न बोलता ...

अश्रूंनाही मी कोंडून घेतले
भावनांनाहि मी दडपले
येईल का तुला
कधी मौन माझे जाणता...

संकटांना मी नेहमीच थोपवले
प्रवाहात मी नेहमी वाहावत गेले
येईल का कधी तुला
मला त्यातून वाचवता ...

परतशील का कधी
मी न सांगता ...

कोमल .....................३० /४ /१०

हे आता करायला पाहिजे


मनातल्या भावनांना आवरायला पाहिजे
आयुष्य छोट आहे त्याची लांबी वाढवायला पाहिजे...

अजून किती दिवस आपल्याच दुःखांना कुरवाळत बसणार
कधीतरी त्यांच्यावरही हसायला पाहिजे...

खूप छाटले आपल्याच स्वप्नांचे पंख
कधीतरी उंच भरारीही घ्यायला शिकायला पाहिजे...

नेहमीच दुसर्यांना समजून घेण्यात दिवस संपतो
कधीतरी स्वतः साठीही वेळ द्यायला पाहिजे....

सुंदर गोड स्वप्न आता नुसतेच भास ठरले
त्या गोड स्वप्नांना आता गाडायला पाहिजे...

नेहमीच वाट पाहिली मी कुणीतरी परतण्याची
आता माझी वाटच बदलायला पाहिजे....

प्रेम नेहमीच भरभरून दिले मी
आता ते कुठेतरी थांबवायला पाहिजे...

निस्वार्थपणे बऱ्याच गोष्टी केल्या आजपर्यंत
आता आपलाही स्वार्थ साधला पाहिजे...

उगाचच सगळ्यांचा विचार करत बसते
आता स्वतःचाही विचार करायला पाहिजे....

लोकांच्या नजरेत नेहमीच सहानुभूती दिसली
आता ती नजर बदलायला पाहिजे....

गर्दीचा तर भाग मी नेहमीच राहिले
आता स्वतःची ओळखही करायला पाहिजे....

कोमल .....................३०/४/१०