Total Pageviews

Thursday, April 29, 2010

नाही मी आता नाही थांबणार ...


नाही मी आता नाही थांबणार ...
अशीच चालत पुढे जाणार ...

ज्यांना सोबत केली
त्यांच्या अश्रुंनीच ओंजळ भरली
आता मी ती ओंजळ रिकामी करणार ...
नाही मी आता नाही थांबणार ...

दुसर्यांच्या हास्यात शोधले मी नेहमीच स्वतःला
त्या हास्यात माझेच हास्य मावळले कुठेतरी
आता मी माझेच हास्य शोधणार ...
नाही मी आता नाही थांबणार ...

प्रत्येकाचे दुःख मी आपले मानले
त्या दुःखातच मी गुंतून गेले
आता मी सारेच दुःख दूर सारणार...
नाही मी आता नाही थांबणार ...

वाट पहिली मी नेहमीच दुसर्यांची
त्यात माझीच वाट कुठेतरी हरवली
आता मी माझीच वाट शोधणार ...
नाही मी आता नाही थांबणार ...

तुटतील नाती म्हणून मी घाबरत होते
त्या नात्यांचाच अंत मी आज पाहिला
आता मी नाही कोणतीही नाती जपणार ...
नाही मी आता नाही थांबणार ...

थकले मी माझी बाजू मांडताना
पण माझ्या मनाची पर्वा नव्हती कुणाला
आता मीच माझ्या मनाला जपणार ......
नाही मी आता नाही थांबणार ...

नाही जमलं कधी प्रेम सिद्ध करायला
त्या प्रेमानेच मला अनेक शिक्षा दिल्या
आता मी भावनांना असंच दडवून ठेवणार ........
नाही मी आता नाही थांबणार ...

दुटप्पी हे जग सारे
स्वार्थाचीच कळे त्यांना भाषा
आता मी हि त्यांना माझी भाषा शिकवणार ...
नाही मी आता नाही थांबणार ...

कोमल ..............................३०/४/१०

Wednesday, April 28, 2010

तुझ्या आठवणीत....


तुझ्या आठवणीत
आजकाल दिवस जातो माझा
कधी आठवते ती संध्याकाळ
तुझ्या सोबत घालवलेली .......
तर कधी आठवतो तो समुद्र
किनाऱ्याकडे धाव घेणारा....
तर कधी कोरडाच भासणारा
आपल्यातच स्वतःला मिटून घेणारा .....
कधी आठवते तू ओंजळभरून दिलेली फुल
तुझ्या प्रेमाच्या सुगंधाने दरवळणारी .......
कधी आठवतो तुझा सहवास
मला तुझ्यात सामावून घेणारा .......
कधी आठवते तुझे अचानक येणे
मनाला सुखावून जाणारे .......
कधी आठवते तुझे असेच निघून जाणे
आजही मला जाळणारे .........

कोमल ...................२९/४/१०

Tuesday, April 27, 2010

तू सोबत असताना.....

तू सोबत असताना......
गरज नाही लागत कुणाची
भीती नाही वाटत कशाची

तू सोबत असताना......
मार्गही सोप्पा होतो
अंधारही नाहीसा होतो

तू सोबत असताना......
कशाला कुणाची वाट बघावी
का उगाचच कसली काळजी करावी

तू सोबत असताना......
सामोरे जाते मी हसत संकटाला
नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला

हे देवा असाच नेहमी सोबत राहा
माझ्याही अन इतरांच्याही ........

कोमल ...................२७/४/१०

ती एक रातराणी


ती एक रातराणी
नाजुकशी, निरागस
सुगंधान सर्वांना बेधुंद करणारी.......

ती एक रातराणी
कोणाच्या तरी प्रतीक्षेत
रोज न चुकता फुलणारी........

ती एक रातराणी
घाव सोसूनही
खूप प्रयत्नाने उमलू पाहणारी .........

ती एक रातराणी
थोडी अल्लड पण
मनापासून हवीहवीशी वाटणारी .........

ती एक रातराणी
सर्वांच्या हृदयाची राणी
आयुष्य तिचे फक्त एका रात्रीची कहाणी ...........

कोमल .....................२१/४/१०

कोश भावनांचे.............


प्रत्येक जण रमतो आपल्याच कोशात.......

कधी प्रेमाच्या तर कधी सहवासाच्या
कधी आठवणींच्या तर कधी विरहाच्या....

आयुष्य त्यांचे त्यातच गुरफटलेले
त्या कोशाचे बंध त्यातच अडकलेले......

कोशातच त्यांचे आयुष्य हरवलेले
त्यातच त्यांचे अस्तित्व लोपलेले......

विसरले ते या कोशाशिवायहि जग असते
आपले अस्तित्व तेव्हा कुठे आपले भासते...

कोशाचे रंग जरी गोड भासले
तरी खरे आयुष्य हे त्याहूनही सुंदर असते.....

जरा डोकावून पहा तुमच्या कोशातून
आयुष्याचे सगळे रंग पहा जरा अनुभवून....

तोडून बंध सारे त्या कोशाचे
जपा रंग आपल्याही अस्तित्वाचे.....

कोमल .........................२७/४/१०

Sunday, April 25, 2010

कोणीतरी असावं जोडीला


कोणीतरी असावं जोडीला
रात्रभर जागत सोबतीला ....

कोणीतरी असावं जोडीला
गप्पांचा फड रंगवायला ...

कोणीतरी असावं जोडीला
सुरात सूर मिसळवायला ....

कोणीतरी असावं जोडीला
मनापासून हसायला ...

कोणीतरी असावं जोडीला
एकांतात आसव गाळायला...

कोणीतरी असावं जोडीला
उगाचच वाद घालायला ...

कोणीतरी असावं जोडीला
पावसात एकत्र भिजायला

कोणीतरी असावं जोडीला
एकाच कपातील चहा प्यायला

कोणीतरी असावं जोडीला
वाळूतून चालायला ....

कोणीतरी असावं जोडीला
आयुष्यभर साथ द्यायला ....

कोमल .............२६/४/१०

आई तुझ्याशिवाय ....


आई तुझ्याशिवाय ....
नसे माझ्या जगण्याला अर्थ
भासे सारे जग निरर्थक ...

तुझ्याशिवाय घर कसं खायला उठत
पाऊल माझंही दारातच अडखळत ...

दिवसरात्र आमच्यासाठी राबत असतेस
तरीही 'मी दमले नाही' असंच सांगतेस ...

कळतो ग मलाही तुझा त्रास
आणणार आहे मी सगळी सुख तुझ्या पायाशी खास ...

नको ग मला अशी जाऊ सोडून एकटी
सगळी लोक हिणवतील मला बोलून पोरकी ...

तुझ्याशिवाय आई कोण घेणार मला कुशीत
बैस जरा इथे मला घे ग एकदा मिठीत ....

कोमल ..................२५/४/१०

आज वाहून जाऊ देत ........


आज वाहून जाऊ देत ........
मनात साठलेल्या शब्दांना ...
डोळ्यात गोठलेल्या अश्रूंना .....
जखमेत सुकलेल्या रुधिराला...
धुक्यात हरवलेल्या आठवणींना ...
डोक्यात घोंगावणार्या विचारांना ....
गुंत्यात अडकलेल्या प्रश्नांना ...
तुझ्या मावळलेल्या हास्याला ...
पहाडासारख्या दुःखांना ...
चिमटीत पकडलेल्या सुखांना ....
मनात लपवून ठेवलेल्या प्रेमाला ...
बंद मुठीत कोंडलेल्या स्वप्नांना ....
आज खरंच वाहून जाऊ देत ......

कोमल ...........................२५/४/१०

फक्त माझ्या बाबांसाठी .......


आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे. हि कविता फक्त त्यांच्यासाठी ......

अंगाखांद्यावर खेळवत आज
इतकं मोठ केल तुम्ही
सुखानं ओंजळ भरण्याच
काम आता करणार आम्ही …

आमच्यासाठी केलेल्या सगळ्या
गोष्टी डोळ्यासमोरून तरळून गेल्या
नकळत पापण्यांच्या
कडाही माझ्या पाणावल्या …

तुमच्यावरच प्रेम व्यक्त
करणं कधी जमलं नाही
पण तुमच्याशिवाय आयुष्याला
काही अर्थच उरत नाही …

नका करू काळजी
तुम्ही हरण्याची
आम्ही असताना नका बाळगू
भीती तुम्ही एकटेपणाची …

आयुष्याचे एक पर्व
संपून नवे सुरु होईल
आमच्या सोबत त्यातही
मग रंगत येईल …

उदंड आयुष्य अन सौख्य
लाभू दे तुम्हाला
अन तुमची सोबत
मिळो आयुष्यभर आम्हाला …


कोमल ..........................२४/४/१०

Friday, April 23, 2010

आठवणीतले सुगंध ...

आठवतात का तुला ?
पहाटेच्या गार वाऱ्याचा सुगंध ..
दारात पडलेल्या प्राजक्ताचा सुगंध ...
जळणाऱ्या चुलीचा सुगंध ..
सारवलेल्या अंगणाचा सुगंध ...
दिवाळीच्या उटण्याचा सुगंध ..
तव्यावरच्या खरपूस पोळीचा सुगंध ..
पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा सुगंध ..
त्यात वाफाळणार्या चहाचा अन कांदाभाजीचा सुगंध ..
समुद्रावरच्या खाऱ्या वाऱ्याचा सुगंध ..
देवघरातल्या उदबत्तीचा सुगंध ..
मनात साठलेल्या तुझ्या आठवणींचा सुगंध ..
अन त्यात हरवलेल्या माझ्या मनाचा सुगंध ..
आठवतात का तुला ?

कोमल ..............................२३/४/१०

Thursday, April 22, 2010

दोन क्षण ....


मैत्री दोन क्षणांची
नकळत झालेली ll

विश्वास दोन क्षणांचा
मनापासून जपलेला ll

प्रेम दोन क्षणांचे
अचानक हरवणारे ll

सहवास दोन क्षणांचा
हुरहूर लावून संपणारा ll

विरह दोन क्षणांचा
आठवणीत जाळणारा ll

सुख दोन क्षणांचे
तेवढ्यापुरते समाधान देणारे ll

आयुष्य दोन क्षणांचे
अस्तित्व जपणारे ll

कोमल .........................२२/४/१०

अस्तित्व माझे शोधतेय मी


अस्तित्व माझे शोधतेय मी
हरवले आहे ते कुठेतरी ...

माणसांच्या गर्दीत ...
प्रेमाच्या बंधनात ...
विचारांच्या कोड्यात ...
भावनांच्या गुंत्यात ...
आठवणींच्या धुक्यात ...
जबाबदारीच्या ओझ्यात ...
दुसर्यांच्या हास्यात ...
अश्रूंच्या ओलाव्यात ...
विखुरलेल्या विश्वासात ...
उरलेल्या आयुष्यात ...
अस्तित्व माझे शोधतेय मी ...

कोमल ...........................२२/४/१०

तेव्हा मला तुझी आठवण येते ...


जेव्हा हि रात्र चांदण्या पांघरते
तेव्हा मला तुझी आठवण येते ...

जेव्हा कुठेतरी कोणीतरी कानात कुजबुजते
तेव्हा मला तुझी आठवण येते ...

जेव्हा हा बेधुंद वर मनाला स्पर्शून जातो
तेव्हा मला तुझी आठवण येते ...

जेव्हा मी माझ्या एकटेपणाला कवटाळून बसते
तेव्हा मला तुझी आठवण येते ...

जेव्हा मी एकांतात अश्रू ढाळते
तेव्हा मला तुझी आठवण येते ...

जेव्हा माझ्यामुळे एखादे निरागस हास्य फुलते
तेव्हा मला तुझी आठवण येते ...

जेव्हा मी विचारांच्या धुक्यात हरवून जाते
तेव्हा मला तुझी आठवण येते ...

जेव्हा मी माझे अस्तित्व शोधते
तेव्हा मला तुझीच आठवण येते ...

कोमल ...............२२/४/१०

Tuesday, April 20, 2010

कुणासाठी ......

हि रात चांदण्यांनी
पांघरली कुणासाठी ......
हि निशब्द शांतता
पसरवली कुणासाठी ......
हा बेधुंद वारा
अडवला कुणासाठी ......
हा अंधार दाट
केला कुणासाठी ......
हे आभाळ आज
दाटले कुणासाठी ......
मी आज एकटी
चालले कुणासाठी ......
हि ओसाड वाट
थांबली कुणासाठी ......
ते अश्रू आज
सांडले कुणासाठी ......
हास्य मी माझे
हरवले कुणासाठी ......
आठवणीत मी
घुटमळले कुणासाठी ......

कोमल .................२०/४/१०

Thursday, April 15, 2010

नशीब


अस एकटच का चालायचं ?
अस किती दिवस जगायचं ?
दुसऱ्यांना समजून घेताना
आपण मात्र अस रिकामच उरायचं
वाटल होत नशिबाला आता तरी बदलायचं
पण एकटीनेच अस किती दिवस ओढायचं ?
दिवस रात्र दुसर्यांच्या हास्यात स्वतःला शोधायचं
आणि आपले दुःख मात्र ऊरात दडवायचं
सगळ्यांना देताना एक दिवस असंच संपून जाईल सगळ
स्वतः साठी मात्र उरणार नाही काहीच माझं असं वेगळ
कदाचित हेच माझं नशीब हेच माझं भाग्यं आहे ...

कोमल ....................१५/४/१०

Wednesday, April 14, 2010

बंध......

बंध मैत्रीचे
नकळत जपलेले ll

बंध आठवणींचे
ऊरात लपलेले ll

बंध भावनांचे
मनात दडलेले ll

बंध नात्यांचे
नशिबाने लाभलेले ll

बंध प्रीतीचे
विश्वासाने बांधलेले ll

कोमल ....................१४/४/१०

शब्दात गुंतता तुझ्या.....

शब्दात गुंतता तुझ्या
मी गीत तुझेच गायले

श्वासात गुंतता तुझ्या
मी एकरूप झाले

विचारात गुंतता तुझ्या
मी उगाच घुटमळले

आठवणीत गुंतता तुझ्या
मी रंगून गेले

भावनात गुंतता तुझ्या
मी अडकून गेले

प्रीतीत गुंतता तुझ्या
मी तुझीच झाले

कोमल ............................१४/४/१०

Monday, April 12, 2010

त्रिवेणी ...........एक प्रयत्न


पाहवत नाही रे मला तुला असं
तुझ्या त्रासाने मला त्रास होतो
,
,
,
मी फक्त माझा त्रास कमी करतेय !!

आठवते का तुला आपली पहिली भेट
अचानक भरून आलेल्या आभाळासारखी
,
,
,
आजकाल आभाळ अगदी निरभ्र असतं !!

किती खुश असायचास रे तू आधी
तुला असं पाहिलं कि मी ही खूप हसायचे
,
,
,
काहीही कर पण माझं हास्य मला परत दे !!

असं म्हणतात प्रेमात लोक
बऱ्याचदा फक्त स्वतःचा फायदा बघतात
,
,
,
कदाचित म्हणून मला प्रेम करणं जमत नाही !!

या जगात खूप स्वार्थी लोक आहेत
नेहमी दुसर्यांना खड्यात पाडणारे
,
,
,
म्हणून आजकाल मी खड्डे बुजावायचं काम करते !!

किती धूळ साचली आहे मनावर
विचारानंवरही जळमट आली आहेत
,
,
,
म्हणून आजकाल मी ही सगळी धूळ झाडत असते !!

ठाऊक आहे मला तू परतणार नाहीस
तसा तू न येण्यासाठीच गेला होतास
,
,
,
पण काल अचानक तुझा निरोप आला !!

कोमल ......................१२/४/१०

आठवणी न सरणाऱ्या .....


आठवणींचे दवबिंदू
सुखावून जातात
कुणाच्याही नकळत
निसटून जातात ......

आठवणींचे पाऊस
नकळत बरसतो
अन कोरड्या मनाला
मनसोक्त भिजवतो .......

आठवणींचा सडा
कधीही पडतो
अन नकळत
सुगंध दरवळतो .......

आठवणींचे चांदणे
आकाश पांघरते
त्याच्या मंद प्रकाशातही
मन नकळत उजळते .......

कोमल ......................१२/४/१०

Sunday, April 11, 2010

अंतरात तू मनात तू
सामावून आहेस ...

शब्दात तू देहात तू
व्यापून आहेस ...

श्वासात तू नयनात तू
भरून आहेस ...

भावनांत तू विचारात तू
गुंतून आहेस ...

मनाच्या गाभाऱ्यात तू
उरून आहेस ...

अस्तित्वात तू वास्तवात तू
जपलेला आहेस ...

कधी हास्यात तर कधी अश्रूत तू
लपलेला आहेस ...

कधी क्षितिजावर तर कधी नक्षत्रामध्ये तू
कोरून आहेस ...

या चांदण्यात या चंद्रमात तू
उजळून आहेस ...

माझ्या नश्वर देहाला मी
तुझ्यात सामावून घेण्यास आतुर आहे ....

कोमल ....................१२/४/१०

तुला कधी जमलंच नाही ........


मैत्री म्हणजे काय ती तू ओळखलीच नाही
निस्वार्थ, निरपेक्ष नात्यांची किंमत तू कधी ठेवलीच नाही ..

विश्वास म्हणजे काय तो तू जपलाच नाही
दिलेल्या शब्दाला तू कधी जागलाच नाही ..

त्याग म्हणजे काय तो तुला कळलाच नाही
निस्वार्थ मनाने तो तू कधीच केलाच नाही ..

आपुलकी म्हणजे काय ती तू कधी जाणलीच नाही
निर्मळ जिव्हाळा तू कधी जपलाच नाही ..

प्रेम म्हणजे काय ते तू कधी जाणलेच नाही
निस्वार्थपणे कसं द्यायचं हे तुला कधी जमलंच नाही ..

जबाबदाऱ्या म्हणजे काय त्या तू कधी निभावल्याच नाही
स्वतःशिवाय कधी तू कोणाचा विचार केलासच नाही ..

आयुष्य म्हणजे काय हे तू जगलासच नाही
ऊन-पावसाचा खेळ तुला कधी कळलाच नाही ..

कोमल ...................११/४/१०

वाट पाहत होते रे ..


वाट पाहत होते रे ..
तू परतण्याची
रडणाऱ्या मनाला
तुझ्यात सामावण्याची ...

वाट पाहत होते रे ..
तुझ्या एका हाकेची
मी दूर जात असताना
तू मला थांबवण्याची ..

वाट पाहत होते रे ..
मी तुझ्या प्रेमाची
माझ्या जळणाऱ्या मनाला
त्यात चिंब भिजवण्याची ..

वाट पाहत होते रे ..
तुझ्या शेवटच्या भेटीची
ठाऊक आहे तू येणार नाहीस
पण तरीही वाट पाहतेय तू स्वतःहून परतण्याची ...

कोमल .............११/४/१०

मुखवटे चेहऱ्यावरचे ..........


मुखवटे चेहऱ्यावरचे ..........
कधी आनंदाचे कधी दुःखाचे
कधी हसणारे कधी रडवणारे
कधी सहानुभूतींचे कधी अगतिकतेचे
कधी आपलेपणाचे कधी परकेपणाचे
कधी सवयींचे तर कधी गरजेचे
कधी प्रेमाचे तर कधी मैत्रीचे
कधी विश्वासाचे तर कधी खोट्या नात्यांचे
कधी टोचणारे तर कधी बोचणारे
कधी दडलेले तर कधी उघडपणे वावरणारे
कधी हसवणारे तर कधी फसवणारे

कोमल .....................९/४/१०

Saturday, April 3, 2010

भास मनाचे ...

भास तुझे नि माझे
निशब्द शांततेचे ......

भास प्रेमाचे नि मैत्रीचे
हळव्या विश्वासाचे .....

भास फुलाचे नि सुगंधाचे
दरवळणाऱ्या आठवणींचे .....

भास जबाबदारींचे नि कर्तव्यांचे
नसलेल्या नात्यांचे .......

भास अंधाराचे नि सावलींचे
मन पोखरणाऱ्या भीतीचे .....

भास मनाचे नि अंतरंगाचे
आपल्याच गूढ अस्तित्वाचे .....

कोमल ....................४/४/१०

मी न माझा राहिलो ....

मी न माझा राहिलो ....

हलकेच उडणारे
केस सांभाळताना
लांबूनच तुला
चोरून पाहताना
मी न माझा राहिलो ....

सहजच नाक्यावर
मैत्रिणींशी बोलताना
हलकेच हसताना
उगाचच तिथे घुटमळताना
मी न माझा राहिलो ....

मग वळून बघताना
घाईत जाताना
ती शोधक नजर पाहताना
अडखळलेल्या वाटेवर
मी न माझा राहिलो ....

येशील जेव्हा कधी तू
माझ्याही सामोरी अशी
डोळ्यात तुझ्या पाहताना
तेव्हाही मी असाच बोलेन
कि, मी न माझा राहिलो ....

कोमल ..................२/४/१०

निरोप ........

विखरून गेले शब्द
गोठलेल्या भावना
अंतरातली शांत
अस्वस्थता !!

आर्त हळव्या जीवाची
निशब्द झाली व्यथा
खोट्या विश्वासाची
फुकाची चिंता !!

कशाला हवी नाती
उगाचच भीती
उद्या डोळे उघडल्यावर
हरवण्याची !!

नकोच तो लळा
ओल्या जीवाचा हळवा
निरोप घेताना
जीव घेई !!

तरीही घुटमळते
वाट हरवलेली
आठवणीत तुझ्या
अजूनही !!

कोमल ........................१/४/१०