Total Pageviews

Tuesday, March 30, 2010

जे सांगायचंय ते सांगून टाक ...


जे सांगायचंय ते सांगून टाक ...

गोठलेल्या मनाला वितळवून टाक
साचलेल्या शब्दांना विखरून टाक
जमेल जसं वाटेल तसं तुझ्या भावना मांडून टाक
जे सांगायचंय ते सांगून टाक ...

भरकटलेल्या विचारांना दिशा देऊन टाक
अर्थहीन स्वप्नांना सोडून टाक
उरलेल्या विश्वासाने मनाला मोकळ करून टाक
जे सांगायचंय ते सांगून टाक ...

अंधारलेल्या वाटा आता उजळून टाक
नवीन स्वप्नांना पंख देऊन टाक
प्रेमाने आयुष्य व्यापून टाक
जे सांगायचंय ते सांगून टाक ...

कोमल ............................३१/३/१०

कधीही कुठेही.....


किंमत ...
किती स्वस्त शब्द ...
सर्रास वापरला जाणारा ....
कधीही कुठेही

प्रेम ...
किती सोप्पा शब्द ...
कुणालाही बोलला जाणारा
कधीही कुठेही

विश्वास ...
किती जड शब्द ...
सहज मोडला जाणारा
कधीही कुठेही

आठवण ...
किती गोड शब्द ...
नकळत चेहऱ्यावर हास्य फुलवते
कधीही कुठेही

मन ...
किती नाजूक शब्द ...
जीवापाड जपावे लागते
कधीही कुठेही

मैत्री ...
किती प्रेमळ शब्द ...
रक्ताच्या नात्यांपेक्षाही जीव लावणारे
कधीही कुठेही

आयुष्य ...
किती सुंदर शब्द ...
मनापासून जगायला शिकवणारे
कधीही कुठेही

कोमल ...............................३०/३/१०

Sunday, March 28, 2010

अंतर...

किती अंतर आहे अजून आपल्यात....

शरीराचे कि मनाचे .....
भावनांचे कि विचारांचे ......

स्वप्नांचे कि अनुभवांचे .....
स्वभावाचे कि कृतीचे .....

गावांचे कि रस्त्यांचे ....
ओढ्याचे कि समुद्राचे .....

काळाचे कि वेळेचे ....
शब्दांचे कि स्पर्शांचे .....

अश्रुंचे कि श्वासांचे .....
मैत्रीचे कि प्रेमाचे .....

कि आहेत फक्त माझ्या
मनातील भासांचे
सगळाच गुंता आहे नुसता
कधी सुटेल का हे कोडे अंतराचे ?

कोमल ......................२९/३/१०

Saturday, March 27, 2010

मनातल्या .............चारोळ्या


बऱ्याच वेळा मी
माझीच नसते
कोणत्यातरी जगात
हरवलेली असते ......

अशीच आहे मी
थोडी वेडी अन विचित्र
जागेपणीच रंगवत असते
मी स्वप्नांची चित्र......

उगाचच कधी कधी
मनाचे आभाळ भरून येते
मग नकळतच आठवणींनी
डोळ्यात दाटून येते.......

पंख तर केव्हाच छाटले
आता तर स्वप्नही अंधुक झाली
मावळत्या सूर्यासोबत
आता सावलीही नाहीशी झाली......

तुझ्या सोबत घालवलेला
प्रत्येक क्षण ताजा होतो
त्या क्षणांसाठी का होईना
तू फक्त माझा असतोस.......

आठवणींच जग
किती विचित्र असते
कधी गर्दीत एकटे तर
कधी मनात गर्दी करते......

दाटलेल्या नयनात
तुझाच भास आहे
शेवटच का होईना
आता फक्त तुझीच आस आहे......

कुणास ठाऊक हे
क्षण कधी संपतील
कदाचित हे माझे
शेवटचे शब्द असतील........

त्या शेवटच्या क्षणीही
मी किती शांत होते
बस !! तुला डोळे भरून
शेवटचं पाहत होते.......

आयुष्याच पान कधी गळून
पडेल याचा नेम नाही
यासाठी कोणत्याही
ऋतुच त्याला बंधन नाही.......

मृत्यू हे एक अगदी
विदारक सत्य आहे
कोणालाही न सोडवता येणारे
ते एक रहस्य आहे........

कोमल ....................२८/३/१०

पण एकटीच ..........


आज पुन्हा आले त्या वळणावर आले आहे
जेथून कधी तुझ्या पावलांसोबत चालले होते
आज पुन्हा चालत आहे
पण एकटीच ..........

आज पुन्हा त्याच जागेवर आले आहे
जेथे रोज भेटायचो आपण
आज पुन्हा तेथे मी आले आहे
पण एकटीच ..........

आज पुन्हा तो सूर्यास्त पाहत आहे
जो पाहिलेला कधी आपण एकत्र प्रेमाने, विश्वासाने
आज पुन्हा पाहत आहे
पण एकटीच ..........

सार काही तेच जुनच आहे
नव्याने अनुभव देणारे
आज पुन्हा अनुभवत आहे
पण एकटीच ..........

आज पुन्हा तो चंद्र हसत आहे
कधी हसला होता तो असाच प्रसन्न आपल्यावर
आज पुन्हा हसत आहे
पण माझ्यावरच ...........

कोमल ................२७/३/१०

आयुष्य ............काही चारोळ्या


आयुष्य नसते
फक्त सुरेख वाट
कधी कधी असतात
काटेही हजारो त्यात ...........

आयुष्याच गणित
बऱ्याचदा चुकत
अन मग बाकी शून्य पाहून
आपल्याला वाईट वाटत ..........

आयुष्य असते का
फक्त सुंदर कविता ?
कधीतरी आपल्याच चुकांनी
ती बनते वात्रटिका ..........

आयुष्य असाव
समुद्र सारख
सगळ्यांना आपल्यात
सामावून घेणार .........

आयुष्य असाव
फुलपाखरासारख
कमी असूनही
सगळ्यांना आनंद देणार ...........

आयुष्यात सुख
नेहमीच देत रहाव
कधी न मागताच
दुसर्यांचे दुःख हि घेत रहाव ...........

कोमल ...................६/३/१०

तुझा फोन .........


आतुरतेने तुझ्या फोनची वाट पाहते
काय बोलायचे हे सगळ ठरवून ठेवते
दिवसभरात घडलेलं सगळ सांगायचं असते.........

नेकमा तुझा फोन येतो, अन वेगळच घडते
तुझ्या आवाजाने भानच हरपते
जे बोलायचं असत तेच विसरते.........

फोन ठेवल्यावर मात्र जाणवते
जे बोलायचं होत ते राहून गेले
अन विसरलेले परत सगळ आठवते...
मग माझ हे वेड मन पुन्हा
तुझ्या फोनची आतुरतेने वाट पाहते.......

कोमल ...................१४/२/१०

नशिबाचे खेळ........

आजकाल हे रोजचच झालाय
मी रोज फक्त स्वतःशीच बोलायचं
स्वतःशीच भांडायचं अन मग स्वतःवरच रागवायचं
का? कशाला? कुणासाठी? कशासाठी?
नाही सापडत आजकाल हि कारणही ........
थकले आहे मी उत्तर शोधून पण सापडलं नाही कधी
सगळा पसारा सांभाळताना वेळही कमी पडतो
अन जेव्हा मिळतो तेव्हा तो स्वतःलाच समजून घेण्यात जातो
कुठ चुकतंय का? काही हरवल तर नाही ?
खूप शोधाल पण सापडत नाही काही
अजून किती दिवस अस स्वतःसोबत बोलायचं ?
का हे आयुष्य असच जायचं ?
आयुष्य असच दुसर्यांना समजून घेण्यात जायचं
अन स्वतःला मात्र हळूहळू विसरायचं
दुसऱ्याच्या आनंदात स्वतःला पहायचं
अन आपल्या मनातील दुःखांना तसंच सोडून यायचं
कदाचित हेच आहेत आपल्या नशिबाचे खेळ
जिथे बसत नाही कशाचाच ताळमेळ

कोमल ......................११/२/१०


नशिबाने मांडले आहेत अजबच खेळ
सारेच जुने तरीही देतो रंग रूप नवे
विषय तेच चोथा झालेले
तरीही अजूनही चघळले जाणारे
आता प्रश्न जरी बदलले
तरी उत्तर मात्र सापडत नाहीत
अन copy करण्याचा तर chance च नाही
इथेही असते नापास होण्याची भीती
अन पास होण्याची तर नाही शाश्वती
बघू कधीतरी समजतील याचेही नियम
शेवटी हा सुद्धा एक खेळच, सांभाळू आपला संयम

कोमल ............................११/२/१०

आजकाल मी..........


आजकाल मी माझी नसते
अशीच कुठेतरी हरवलेली असते
उगाचच सगळ न्याहाळत बसते
तुझ्या आठवणीत बुडून जाते
अन मग स्वतःशीच नकळत हसते
तुझी पत्रे वाचून हरखून जाते
अन तुझ्या आवाजाने भान हरपते
तुझ्या चारोळीत स्वतःला शोधते
अन माझ्या कवितेते तुलाच गुंफते
नाही म्हटल तरी तुझी ओढ लागते
अन तुझ्या भेटीची आस वाढते
बघ न ! म्हणूनच
आजकाल माझे कशातच लक्ष नसते
अन तुझ्यामुळे मी सारे जग विसरते

कोमल ....................१७/२/१०

नाती .......काही चारोळ्या ........

ही नाती खुप
विचित्र असतात
गुंता सोडवताना ती
आणखीनच गुंतत जातात
.............................
काही नाती कधी
कळतच नाही
समजून घेउनही ती
कधी उमजतच नाही
..................
नात्यांमध्ये असावा
लागतो विश्वास
नाहीतर त्यात
उरत नाही काहीच खास
.........................
नाती असतातच मुळी खास
त्यांच्यामुलेच तर असते
आपल्याला जीवनामध्ये
जगण्याची आस
............................
कोमल

नाती कधी प्रेमाची
तर कधी निखळ मैत्रीची
स्वार्थ नसलेल्या
निर्मळ मनाची ..........

नाती आपलेपणाची
नाती हळव्या मनांची
नाती खास जपलेल्या
अनमोल क्षणांची .....

नाती बिनरक्ताची
अनोळखी चेहऱ्यांची
कधी सहजच जपलेल्या
निशब्द भावनांची ............

नाती जुळतात
आपलेपणाने
अन वाढतात
ती विश्वासाने ........

नाती जोडतात
भावबंध
दरवळतो त्यात
ऋणानुबंध ........

नाती नाही देत
केवळ साथ सुखात
ती देतात आधार
न मागता दुःखात ........

काही नाती असतात
क्षणभर साथ देणारी
तर काही आयुष्यभर
ऋणानुबंध जपणारी ........

नात्यांना नसते केवळ
सुखाची किनार
दुःखातही ती
होतात बहारदार ........


कोमल .................१/३/१०

प्रेम ..............काही चारोळ्या ......


प्रेम नाही हा नुसताच
शब्दांचा खेळ
येथे जमवावा लागतो
भावनांचा ताळमेळ ......

प्रेमाच्या या खेळात
हार-जीत नसते
कधीतरी आपणही हरून
समोरच्याला जिंकायचे असते .....

'माझ तुझ्यावर प्रेम आहे '
हे बोलण खूप सोप्प असत
पण हेच प्रेम शेवट पर्यंत
जपण फारच कठीण असत .........

प्रेमाची सुरवात अगदी
नकळतच होते
एकमेकांशी बोलताना
मन गुंतत जाते ...........

प्रेमात जेव्हा
वाढतो विश्वास
तेव्हा हे नाते
बहरते खास .....

प्रेमात जेव्हा होऊ
मनापासून एकरूप
दोन जीव जातील
तेव्हा एकमेकांत सामावून ...........

प्रेमाला नाही माहित
काहीही फायदा
इथे एकमेकांना जीवापाड
जपण्याचा असतो मूक वायदा .........

कधीतरी प्रेम
करून तर पहा
आठवणींच्या हिंदोळ्यावर
झुलून तर पहा ......

प्रेम जेव्हा
होते निस्वार्थ
तेव्हाच मिळतो
आयुष्याला गोड अर्थ .....

प्रेमाला नसतो
कोणताही रंग
जो पडतो यात
तो होतो दंग ......

प्रेमाच्या कुपीतून
दरवळतो सुगंध
अन क्षणभर हे
मनही होते बेधुंद .........

प्रेमावर लिहू
तेवढ आहे कमीच
चला आता तुम्हीही
व्हा यात सामील ...........

कोमल .............१/३/१०

Thursday, March 25, 2010

कुणीतरी लागत ...


कुणीतरी लागत ...

मनापासून हसणार ....
सहज मनातल बोलणार ....
कधीतरी हक्काने रागावणार ....
प्रेमाने सांभाळून घेणार ...
आसवांना बांध घालणार ...
मौन जाणणार ....
आपल्याही मनाला जपणार ....
जीवापाड प्रेम करणार .....
न मागता सोबत करणार ...
घरी वाट पाहणार ....
आपण दिसलो नाही कि काळजी करणार ...
उशीर झाला म्हणून रागावणार ....
नात्यांना जपणार ....

खरच !! कुणीतरी असाव लागतं आपल खास
आपल्यापेक्षाही आपल्याला ओळखणार ....

कोमल ................२५/३/१०

कदाचित हेच प्रेम असते ........


प्रेमावर लिहू तितके कमीच आहे. माझा हा एक प्रयत्न आहे.
यावर जेव्हा सुचेल तेव्हा याच धाग्यावर मी ते लिहित जाईन.

तो बेधुंद वारा
ती नाजुकशी झुळूक
तरीही त्याचं अस्तित्व जाणवते
कदाचित हेच प्रेम असते ........

तो काटेरी निवडुंग
अन ती सुगंधी रातराणी
तरीही ते एकत्र फुलतात
कदाचित हेच प्रेम असते ........

तो खवळलेला समुद्र
अन ती संथ वाहणारी नदी
तरीही त्यांचा संगम होतो
कदाचित हेच प्रेम असते ........

तो निष्पर्ण वृक्ष
अन ती बहरणारी वेल
तरीही ते एकत्र वाढतात
कदाचित हेच प्रेम असते ........

तो कर्कश आवाज
अन ती मंजुळ स्वर
तरीही दोघे एकत्र गुणगुणतात
कदाचित हेच प्रेम असते ........

कोमल ..................२१/२/१०

त्याची जर्नल अपूर्ण असते
अन तिच्या जर्नलला कव्हर नसते
ती त्याच्या आकृत्या पूर्ण करते अन
तो जर्नलला कव्हर घालतो
कदाचित हेच प्रेम असते .......

तो छत्री घरीच विसरतो
अन तिच्याजवळ छत्री असते
तरीही दोघ एकत्र भिजतात
कदाचित हेच प्रेम असते .......

त्याच्याजवळ स्वेटर असते
अन ती कुडकुडत असते
तो तिला स्वेटर देतो
अन ती कुडकुडनाऱ्या त्याला उबेची मिठी देते
कदाचित हेच प्रेम असते .......

त्याला तिखट फार प्रिय
अन तिला गोड .......
तरीही तिने केलेला शिरा तो आवडीने खातो
कदाचित हेच प्रेम असते .......

कोमल ........................२३/२ /१०

तो रात्री जागून प्रोजेक्ट करत असतो
अन ती कादंबऱ्या वाचून त्याला सोबत करते
कदाचित हेच प्रेम असते ........

तो तिला चिडवत असतो
अन ती उगाच खोट रागवत असते
कदाचित हेच प्रेम असते ........

तिचा उपवास असतो
अन त्यालाही जेवण जात नाही
कदाचित हेच प्रेम असते ........

तिच्या फक्त हसण्याने
त्याचा चेहरा फुलतो
कदाचित हेच प्रेम असते ........

तिचे पाणावलेले डोळे पाहून
त्याच्या जीव कासावीस होतो
कदाचित हेच प्रेम असते ........

ती उशिरा घरी दमून येते
अन तो मस्त चहा करून देतो
कदाचित हेच प्रेम असते ........

तिची चुकून खारट झालेली भाजीही
तो आवडीने खातो
कदाचित हेच प्रेम असते ........

त्याच्या हरलेल्या मनाला
ती नवीन उभारी मिळवून देते
कदाचित हेच प्रेम असते ........

त्याच्या कठीण काळात
ती त्याला सोबत करते
कदाचित हेच प्रेम असते ........

त्याच्या अंधारलेल्या वाटा
ती उजळून देते
कदाचित हेच प्रेम असते ........

त्याच्या बोलवण्यावर
ती धावून जाते
कदाचित हेच प्रेम असते ........

त्याच्या फक्त एका हाकेने
ती सारे जग विसरते
कदाचित हेच प्रेम असते ........


कोमल .....................२४/२/१०

काही सांगशील का मला ?


काय चाललाय काही सांगशील का मला ?
तुला नक्की काय हवंय काही बोलशील का मला ?
माझे प्रेम तुला कळत नाही
कि न कळण्याचे नाटक करतोस ?
अरे तुला कळत कसं नाही
यामुळे माझा जीव किती जळतो .........
आजपर्यंत कधी बोलले नाही
मी हि माझ्या मनाची व्यथा
पण याचा अर्थ असा नाही
कि मला मांडताच येत नाही माझी कथा .........
आवडत नाही रे मला स्वतःला असा मांडण
किती तरी वेळा सांगितलं पण तुला ते नाही कधीच कळलं
कळत नाही हि चूक आहे का तुझी
कि प्रत्येक वेळी तुला समजून घेणाऱ्या माझी ?

कोमल ....................६/३/१०बघा कधी जमतंय का ........

स्त्रिया रोज अनेक भूमिका जगत असतात आणि नीट पारही पाडतात पण या रोजच्या धावपळीत तिच्यातील मैत्रिणीला कधी विसरू नका. कधीतरी तिलाही जाणून घ्यायचा प्रयत्न करा, तुमच्या नुसत्या प्रयत्नानेही ती सुखावेल ....

कधी मुलगी तर कधी बहिण ...
कधी कुणाची पत्नी तर कधी आई ...
वेगवेगळ्या विशेषणांनी सजत तीच नाव
आपल्या माणसांशिवाय रिकाम असत तीच गाव ...

दिवसभर सगळ्यांसाठी असते ती राबत
कधी पिल्लांसाठी असते ती रात्रभर जागत
नाही ठाऊक तिला दमण काय असतं
आपल्या माणसांना चुकांसकट
सामावून घेण्याइतपत तीच मन मोठ असतं ...

स्वतःच्या स्वप्नांना कोंडून मनात
दुसर्यांचीच स्वप्न तिच्या डोळ्यात दिसतात
कधीतरी तिच्याही स्वप्नांना जाणून घ्या ,तिच्याही इच्छेला मान द्या ...
ती तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा नाही करत
कारण तीच मान जाणण्याचा तुम्ही कधी प्रयत्नच नाहीं करत

आठवतंय का तुम्हाला शेवटच
फुल तिला कधी दिल होत ?
खुललेल्या कळी सारखे तिचे मोहक
हास्य तुम्हाला कधी दिसले होत ?

बाहेरच्या कामाचा ताण तुम्ही बर्याचदा तिच्यावर काढता
नेहमीच तुम्ही तिला गृहीत धरता ...
दिवसभराच्या ताणाने तीही थकलेली असते तुमच्याचसारखी
पण त्याची तक्रार ती करत नाही सारखी सारखी ...

कधीतरी तिच्याशीही थोडंस मनमोकळ बोला
सहजच तिला प्रेमाने जवळ घ्या
मग बघा कशी खुलेले तिची कळी
अन मग तीही होईल मनमोकळी

मान्य आहे दिवसभराच्या
गडबडीत नसतो स्वतःसाठीही वेळ
पण विसरू नका आपल्या माणसांशिवाय
नाही जमत कसलाच ताळमेळ

जमल तर थोडस तिचही मन घ्या जाणून
काय हव आहे का तुला ? विचारा निदान एकदा तरी पाहून ...

कोमल ........................२५/३/१०

Tuesday, March 16, 2010

सुखाची व्याख्या...........


सुखाची व्याख्या अजून जमली नाही मला
दुःखाचीच किनार लाभली बऱ्याचवेळा....

कधी मागितली नाही मी पैशाची खाण
परवा नाही हो जरी झिजली माझी वहाण...

जमवतेय अजूनही घरट्यासाठी काडी-काडी
नाही मागितली हो मी कधी मी बनारसी साडी....

लागत नाही हो मला नेहमी पंचपक्कानाचे ताट
साध्या डाळ भाताचीच मी पाहत असते वाट....

नको आहे मला भेटवस्तूंची खैरात
एखादा गुलाबच पुरेसा मला...

नको आहे मला प्रेमाचा दिखावा
मनापासून सोबत करणारा साथीच हवा...

तरीही येत नाही दया देवाला
अजूनही सवड नाही आहे त्याला....

मग तुम्हीच सांगा कशी जमणार मला सुखाची व्याख्या
कारण अजूनही दिसतात सगळ्याच गोष्टी सारख्या....

परिस्थिती बदलेल कधीतरी हीच आहे आशा
माझ्या धीराने देवालाच येईल कधीतरी निराशा...

कोमल ...................१६/३/१०

का? कशासाठी ?

घराघरतल्या गृहिणीची होणारी मानसिक ओढाताण मांडण्याचा हा एक प्रयत्न .........

रोजच उठायचं ,
रोजच खपायच यांच्यासाठी
का? कशासाठी ?

रोजच फिरायचं यांच्यापाठी
लवकर आवारा, उठा वेळेवर
का? कशासाठी ?

यांना नसते कशाचीही फिकीर
मी मात्र सगळा वेळ घालवते यांच्यापाठी
का? कशासाठी ?

चहा काय ...कॉफी काय .....सगळ्यांच्या नानातऱ्हा
तरीही न कंटाळता पुरवते मी सगळकाही
का? कशासाठी ?

मला नाही का वाटत ......
कधीतरी मलाही उठवाव उशिरा कोणीतरी
हातात आणून द्यावा निदान एक चहा सकाळी
थोडा वेळ घालवावा स्वतःसाठी
पण याचे कुणाला काय पडले
माझे मोल त्यांनी न जाणले
आणि जाणूनही काय फरक पडणार आहे?
माझे रोजचे दिनक्रम चालूच राहणार आहेत
मी मात्र रोज स्वतःला
एकाच प्रश्न करायचा जगतेय मी,
का? कशासाठी ?

कोमल ................१५/२/१०

जमलं तर येऊन जा ..........


जमलं तर येऊन जा ..........
माझ्याशी थोड प्रेमाने बोलून जा

जमलं तर येऊन जा ..........
हलकास स्मित तरी देऊन जा

जमलं तर येऊन जा ..........
जुन्या आठवणी उजळून जा

जमलं तर येऊन जा ..........
आपली ती जुनी जागा पाहून जा

जमलं तर येऊन जा ..........
तुला पाहून माझे पाणावलेले डोळे पाहून जा

जमलं तर येऊन जा ..........
माझी शेवटची भेट तरी घेऊन जा

कोमल ..............१५/२/१०

तुझ माझ नात

तुझ माझ नात आहेच मुळी खास
कारण त्यात भरला आहे मनापासून विश्वास

अंतरान काही फरक पडत नाही
मी नेहमीच तुजसोबत राहीन

प्रत्येक वळणावर तुझी सोबत लागते
नाहीतर हि वाटही मला कंटाळवाणी भासते

तो चंद्रही फार छान दिसतो
जेव्हा तू मजसोबत असतोस

बघ !! हा प्रवास होईल अजून सुंदर
जेव्हा तुझी साथ राहील अशीच निरंतर....

कोमल

अशी का हि मुल विचित्र वागतात ?

अशी का हि मुल विचित्र वागतात ?

आधी विचार करायला भाग पडतात
नंतर जास्त विचार करू नकोस अस सांगतात

सुरवातीला खूप बोलतात
अन ओळख नसतानाही वेळ मागतात

कळत नाही यांच्या काय असत मनात
म्हणतात आधी मैत्रीने करू सुरवात

यांची तक्रार असते मुली घेतात त्यांचा फायदा
मग कशाला बोलतात मुलींशी, हा कसला तक्रारींचा नवीन कायदा?

सोबत बायको असतानाही आजूबाजूला बघतात
अन मग लवकर लग्न केल म्हणून जन्मभर रडतात

मित्राचा नवरा झाल्यावर वागण याचं बदलत
अन वरून तक्रारहि करतात, आता तू मला नाही समजत

वागण्याची यांची तऱ्हाच असते वेगळी
कारण शेवटी हि मुल असतातच सगळी सारखी

कोमल .................३१/१/१०

प्रेम म्हणजे....

प्रेम म्हणजे नेमक काय असते ?
शारीरिक आकर्षण कि मानसिक ओढ.....
दुसऱ्यासाठी केलेली तडजोड
कि दोघांनी दाखवलेला समंजसपणा.......
आपलेपणाची औपचारिकता
कि एक हळुवार फुलणार नाते .....
फक्त सुखात आपलेपणा दाखवणारे
कि दुःखातही आधार देणारे ....
एकमेकांच्या कमतरता दाखवणारे
कि एकमेकांना पूर्णत्व देणारे .......
प्रेम असते का एक मळलेली तोकडी पाऊलवाट
कि विश्वासावर सुरु झालेला, न संपणारा एक प्रेमळ प्रवास....

कोमल ................९/२/१०

एक जळकी सिगरेट ........

हि कविता मी स्मोकिंग ला प्रोत्साहन देण्यासाठी नाही केली आहे. लोक या विषाच्या आहारी का जातात याचा फक्त एक शोध घेण्याचा हा प्रयत्न होता. स्मोकिंग हे आपल्या प्रतिष्ठेसाठी किंवा आपले त्रास, दुःख विसरण्यासाठी उत्तम उपाय आहे असे बऱ्याच जणाना वाटत पण हे सगळ तात्पुरत आहे हे त्यांना कळत नाही.


जेव्हा सगळे माझ्याशी भांडले
माझ्यापासून खूप दूर झाले
आपले म्हणवणारेही जेव्हा सोडून गेले
तेव्हा माझ्यासोबत फक्त होती
माझी एक जळकी सिगरेट ........

ज्यांच्यासाठी अपमान सोसला
ज्यांच्यामुळे रात्री जाळल्या
तेच माझे स्वार्थी सोबती जेव्हा
माझ्यावरच उलटले
तेव्हा माझ्यासोबत फक्त होती
माझी एक जळकी सिगरेट ........

जेव्हा विचारांनी झालो होतो हैराण
मनाच्या चिंद्या झाल्या होत्या पार
कुजक्या गोष्टींनी डोक जेव्हा व्यापल होते
तेव्हा माझ्यासोबत फक्त होती
माझी एक जळकी सिगरेट ........

जिच्यासाठी केला होता रात्रीचा दिवस
जिच्यासाठी भांडलो होतो मित्रांशी एक दिवस
तीच जेव्हा मला अंधारात सोडून गेली एकटे
तेव्हा माझ्यासोबत फक्त होती
माझी एक जळकी सिगरेट ........

आता नसतो मी कोणाहीमध्ये
हरवलेला असतो मी माझ्यातच नेहमी
तेव्हा कोणीही सोबत नसलं तरीही
आता माझ्यासोबत मात्र असते
माझी एक जळकी सिगरेट.......

कोमल ..................१४ / २ /१०शब्दांनी तुझ्या ......


घुसमटलेला श्वास
अन दाटलेला कंठ
शब्दांनी तुझ्या ......

गोठलेले क्षण
अन घायाळ मन
शब्दांनी तुझ्या ......

रोजचीच पाऊलवाट
घुटमळली आज
शब्दांनी तुझ्या ......

अंधुक प्रकाश
दाटले आभाळ
शब्दांनी तुझ्या ......

मूक प्रतिसाद
डोळ्यांनीच दिला
तरीही न जाणला
शब्दांनी तुझ्या ......

आज हरले मी
कोसळले मी
नाही सावरले
शब्दांनी तुझ्या ......

कोमल .................२७/२/१०

कधीतरी हे करून तर पहा ...........


कधीतरी स्वतःहून देऊन तर पहा
देण्यात जे सुख असते ते घेऊन तर पहा ......

कधीतरी दुसऱ्याला समजून तर पहा
समजून घेण्यातला आपलेपणा अनुभवून तर पहा .....

कधीतरी दुसर्यांशी बोलून तर पहा
बोलण्याने मिळणारे समाधान घेऊन तर पहा .....

कधीतरी दुसऱ्याला हसवून तर पहा
दुसर्यांना हसताना बघण्यात येणारी मजा घेऊन तर पहा ............

कधीतरी दुसर्यांचे अश्रू पुसून तर पहा
त्या अश्रुंमधला ओलावा जाणवून तर पहा ......

कधीतरी निखळ मैत्री करून तर पहा
बिनरक्ताची ती अनमोल नाती जपून तर पहा .....

कधीतरी एखादयाला मदत तर करून पहा
माणुसकी काय असते हे अनुभवून तर पहा .......

कधीतरी मनापासून खरे बोलून तर पहा
सुखाची झोप कधीतरी घेऊन तर पहा ......

कधीतरी एखाद्याला मनापासून दाद देऊन तर पहा
आत्मविश्वास काय करू शकतो हे आजमावून तर पहा .....

कधीतरी स्वतःलाही थोडा वेळ देऊन तर पहा
स्वतःशीच मनमोकळ बोलून तर पहा .....

कधीतरी मनापासून प्रेम करून तर पहा
आयुष्य किती सुंदर आहे हे एकदा तरी अनुभवून पहा .......

कोमल ...........................२३/२/१०

नियती......

नियती......


कुणी न जाणले रूप हिचे
पण वेळोवेळी अस्तित्व दाखवते
तीच घडवते, तीच बिघडवते
तुटलेल्या नात्यांना तीच जुळवते
न मागता सर्व काही देते
अन जास्तीचे ओरबडून नेते
कधी निसटलेल्या क्षणांना जुळवते
तर काही आठवणी पूसटही करते
कुठून येते अन कुठे जाते
कोणी न जाणला मार्ग हिचा
पण योग्यवेळी आयुष्यात बदल घडवते
कदाचित ह्यालाच म्हणतात नियती !!

कोमल ...................१८/१२/०९

तो चंद्र अजूनही...........


तो चंद्र अजूनही आहे तिष्टत
तू परतण्याची वाट पाहत
लवकर निघून ये रे आता
अजून वाट नाही पाहवत

बघ न ! कसे आहेत सगळेच हसत
नेहमीच असतात मला चिडवत
मी पण आता त्यांना नाही रागवत
कारण तू तर नाही न आता मजसोबत

कंठ दाटला कि आसवही न विचारता येतात
अन मग एकांतात मला सोबत करतात
नाही रे अजून वाट पाहण जमत
तो चंद्रही बघ ! अजूनही आहे तिष्टत

कोमल .....................१७/२/१०

का कुणास ठाऊक ?

का कुणास ठाऊक काही गोष्टी कधी उमगल्याच नाहीत मला
कारण शाळेपासून काही गोष्टी आजपर्यंत कधी जमल्याच नाहीत मला !

म्हणे कॉपी करायलाही लागत डोक हुशार
मी मात्र पहिल्यांदाच करुन झाले बेजार
तेव्हापासून ठरवून टाकल बुवा हा प्रांत नाही आपला
काही गोष्टी आजपर्यंत कधी जमल्याच नाहीत मला !

शेजारची पिंकी दिसते किती मॉड
कुणालाही मधुमेह होईल इतक बोलते गोड
कस या कंटाळत नाहीत इतक नाटकी वागायला
काही गोष्टी आजपर्यंत कधी जमल्याच नाहीत मला !

ठाऊक आहे मला या जगात सरळ नाही कोणी
गोड बोलून लोक इथ खातात टालूवरच लोणी
कस जमत यांना सहज खोट बोलायला
काही गोष्टी आजपर्यंत कधी जमल्याच नाहीत मला !

असेन मी जगासाठी मुर्ख अन बावळट
पण नाही जमत मला खोट करण नाटक
कदाचित फ़सवण सोप्प असेल लोकांना
पण आजही मी नाही फसवू शकत स्वताला
बर आहे ! काही गोष्टी आजपर्यंत कधी जमल्याच नाहीत मला !

कोमल ....................२६-१०-०९

कुणी सांगेल का हो मला?

कुणी सांगेल का हो मला?
का वाहे हा वारा?
लोकांना सुखावण्यासाठी की
आप्तान्ना निरोप देण्यासाठी.....

का उगवतो हा सूर्य?
दिशा उजळण्यासाठी की
अंधार जाळण्यासाठी.....

का खवलतो हा समुद्र?
शांतता भंग करण्यासाठी की
स्वतःचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी.....

का बरसतो हा मेघ?
तप्त धरणीला तृप्त करण्यासाठी की
त्याच्याच मनाला रीते करण्यासाठी .....

का सळसळतात ही पाने?
नुसताच आवाज करायला की
त्यांचेही अस्तित्व दाखवायला........

का उमलतात ही फुले?
सुगंध पसरवायला की
नवीन जग पहायला.....

का फुटते झाडाला पालवी?
मोसमात बहरण्यासाठी की
नवीन आशा पल्लवित करण्यासाठी......

निसर्गाची ही रुपे पाडती विचारत मला
काय सांगायचेय त्यांना कुणी सांगेल का हो मला?

कोमल २७/११/०९

माझ अस्तित्व शोधतेय मी .....


या जगाच्या चक्रव्युहातुन बाहेर पडून
नव्या वाटा, नव्या दिशा चाचपड़तेय मी
माझ अस्तित्व शोधतेय मी ...........

कधी अड़खळत कधी चाचपडत
कधी अंधारात तर कधी अंधुक प्रकाशात
माझ अस्तित्व शोधतेय मी ...........

कशाचीही नहीं पर्वा कुणाचीही नाही भीती
तरीही कुणालाही न दुखवता
माझ अस्तित्व शोधतेय मी ...........

कधी हरण्याची भीती तर कधी जिंकण्याची उर्मी
खुप पुढे जायचय एवढच ठरवून
माझ अस्तित्व शोधतेय मी ...........

कोमल

मुखवटे ........

मुखवटे ........

कधी आनंदाचे अन दुःखाचे
प्रेमाचे तर कधी खोटेपणाचे
आपलेपणाचे तर कधी अगतिकतेचेही
निरनिराळ्या रंगांचे निरनिराळ्या ढंगांचे
जितका विचार कराल तितके कमीच असतील हे मुखवटे....

कधी स्वार्थ चढ़वती तर कधी परिस्थिति भाग पाडते
कधी त्यात बळजबरीचे हास्य तर कधी मगरीचे अश्रुही दिसते
कधी बनते ती गरज तर कधी सवयही जड़ते
जितके शोधाल तितकी कमीच पडतील कारणे,
कारण तीच चढ़वती मुखवटे
जरा नीट पहा कदाचित तुमच्याही
आजुबाजुला फिरत असतील असेच काही मुखवटे.....

कोमल ..........४/११/०९

सहजच वाटल !!!

सहजच वाटल !
स्वतःशीच थोड बोलाव मनापासून
अन थोड रागवाव चुकीच्या गोष्टींवर
मग काढावी समजूत स्वतःलाच कवेत घेउन ...

सहजच वाटल !
थोड हसून घ्याव स्वतःवरच मनापासून
अन नकळत रडूनही घ्याव काही आठवणीवर
मग पुसावे स्वतःचेच डोळे...

सहजच वाटल !
जरा दूर फिरून याव स्वतःबरोबर
अन मग घालवावा थोडा वेळ विचारात
मग मिटून जुन्या गोष्टी याव परत माघारी ....

सहजच वाटल !
जरा गुन्ता सोडवू मागील जमाखार्चांचा
काय गमावल अन काय कमावल याचा आढावा घेऊ
मग उरलेल्या बाकीसह नवीन आयुष्य जगू...

सहजच वाटल !
अजुन किती करायचे स्वतःचेच लाड
जरा आजुबाजुलाही पाहू
अन त्यांच्याही सुखदुखात त्यांना सोबत करू .......

कोमल .......... १५/१२/०९

एक कळी........


ती अशीच एक
अल्लड कळी
थोडीशी गोड
अन थोडीशी खुळी ll

रडताना कधी तिला
पाहिले नाही
पण दिवसरात्र ती
फक्त हसतच राही ll

ती वेडी कळी
एक दिवस प्रेमात पडली
दिवसरात्र फक्त
त्याच्या विचारात गुंतली ll

किती समजावलं तिला
कधी प्रेमात पडू नकोस
आपल सुख कधी अस
हरवू नकोस ll

पण तरीही ती
हरवली आकंठ प्रेमात
अन एकदिवस त्याने
केला तिचा घात ll

जो होता
तिचा श्वास
त्यानेच तोडला
होता तिचा विश्वास ll

खचली ती पार
कोलमडून गेली
त्याच्या आठवणीत
दूर निघून गेली ll

असते तिची नजर
दूरवर हरवलेली
कसल्यातरी विचारात
गुंतलेली ll

मला पुन्हा पहायचंय
तिला हसताना
फुलांसमवेत
मजेत बागडताना ll

हरवून गेलेले क्षण
काही परत येत नाही
मग कशाला आपल मन
त्यावर विचार करत राही ll

उठ ग परत !
अशी बसू नकोस येथे
दूरवर जायचं तुला
अशी थांबू नकोस तेथे ll

काही चुकीच्या गोष्टींसाठी
का कुणी आयुष्य गमवायचं
कशाला त्या मुर्खासाठी
आपल अस्तिव मिटवायचं ll

आज ती कळी
बरीच सावरली आहे
पुन्हा एकदा ती
फुलांमध्ये हरवली आहे ll

कोमल ......................१७/१/१०

आठवतेय ग मला..


आठवतेय ग मला..
ती आपली पहिली भेट
शांत किनारा
धुंद वातावरण
फ़क्त तू अन मी ll

आठवतेय ग मला..
तो खारा वारा
ती लाटांची गाज
वार्याने उडणारे तुझे केस
अन तुझी लाल ओढ़णी ll

आठवतेय ग मला..
तुझ लाजत बोलण
हलकच हसण
चोरून बघण
माझ्याही मनाला ते सुखावणार ll

आठवतेय ग मला..
तुझे खुप सारे प्रश्न
माझी त्यावर उत्तरे
तुझी आश्वासक नजर
अन तो मोहक स्पर्श ll

आठवतेय ग मला..
निरोप देताना दाटलेला
तुझा कंठ, डोळ्यातले अश्रु
जडावलेले माझेही पाय
अन पुन्हा भेटण्याची ओढ़ ll

आठवतेय ग मला..
आपल झालेल भांडण
तू धरलेला अबोला
माझे अस्वस्थ मन
अन रडून सुजलेले तुझे डोळे ll

आठवतेय ग मला..
घरातल्यांचा नकार
आपल्या मनाची तगमग
तुझी लागुन राहिलेली काळजी
अन वाड्लेला दुरावा ll

आठवतेय ग मला..
नंतर आपण परत भेटलोच नाही
भेटायचेय ग मला परत
पहायचय तुझ्या डोळ्यात स्वतःला
विराघलायचय पुन्हा एकदा तसच ll


कोमल........६/१/१०

ll आराध्य देवता ll


तू आराध्य देवता
तूच विद्येचा स्वामी
शरण आलो तुला
आता मागणे नाही काही ll

साजिरे रूप तुझे
पाहता भान हरपते
अन तुझ्या चिंतनात
मन गुंग होते ll

पुष्कळ दिलेस आम्हा तरी
आमचे मागणे संपत नाही
पण तू सोबत असलास
कि अजून लागत नाही काही ll

कारण फक्त तुझ्या अस्तित्वानेच
येतो आमच्या असण्याला अर्थ
नाहीतर या स्वार्थी जगात
सारेच आहे व्यर्थ ll

कशी रे इथे हि
लोक अशी वागतात
स्वतःला पुढे नेण्यासाठी
दुसऱ्याला खड्यात पाडतात ll

पण तुझ्यावरचा विश्वासच
आम्हाला जगायला शिकवते
अन संकटातही वाट
शोधून देते ll

तुझा आशीर्वाद असेल सदैव
सोबत हीच करतो आम्ही आशा
जी जगण्याला देईल
आमच्या नवीन दिशा ll

कोमल .....................१९/१/१०

राहून गेल ..........


किती दिवस झाले ना ..........
तुला हसताना नाही पाहिलं
खळाळनाऱ्या तुझ्या हास्यात
माझ हसायचं राहून गेल ..........

किती दिवस झाले ना ..........
तुझा आवाज ऐकला नाही
तुझ गाण गुणगुणताना मध्येच
माझ नाव ऐकायचं राहून गेल ......

किती दिवस झाले ना ..........
आपण बोललो नाही हळव्या विषयांवर
विचारांच्या गुंतागुंतीत
माझ रडायचच राहून गेल ........

किती दिवस झाले ना ..........
तुझी सोबत नसते आता
तुझ्या आठवणीनसोबत जगताना
तुझ्या मिठीत विरघळायच राहून गेल .......

किती दिवस झाले ना ..........
आपली भेट झाली नाही
तुझ्या कामाच्या नादात
आपल भेटायचंच राहून गेल .....

कोमल ..................१४/२/१०

अंधार...

तोच रोजचा अंधार
घुसमटलेला श्वास मनाचा .....
हरवलेली दिशा, सुटलेली आशा
भेसूर आवाज शांततेचा .......
सहनही होत नाही अन सांगताही येत नाही
संपेल कधी हि असहायता ......
पण तरीही विश्वास आहे
कधीतरी नक्कीच येईल
ती सोनेरी पहाट.....
अन मग ! नवीन आशा, उजळतील दिशा
दाखवतील वाट विश्वासाच्या

कोमल .........................८/२/१०

असं का होत ?

असं का होत ?

चुका नसताना ऐकून घेतो
गुन्हा नसताना शिक्षाही भोगतो .........

मनापासून प्रेम करूनही व्यक्त नाही करत
ठरवूनही विचारांचा गुंता नाही सुटत ..........

प्रयत्न करूनही यश नाही मिळत
अमाप पैसा असूनही झोप काय हे नाही कळत ........

अनोळखीही कधीतरी दुःख वाटून घेतात
तर कधी आपलीच माणसे नकळत रडवतात ..........

आपण खर बोलूनही होतो विश्वासघात
मग सगळीच स्वप्न डोळ्यादेखत जळतात त्यात .........

दुसऱ्यांना समजून घेताना वगळतो स्वतःलाच
अन मग त्याचाही दोष देतो दुसऱ्यालाच........

आपल म्हणवणारी बरीच जण असतात
पण गरज असते तेव्हा सोबत कुणीच नसतात .........

आयुष्याचे प्रश्न सोडवताना वेळ कमी पडतो
अन एकाचे उत्तर मिळाले कि आयुष्य आपला प्रश्नच बदलतो .........
असं का होत?

कोमल
कोमल ...................४/३/१०

तुझ जाण.....

तुझ जाण मनाला हुरहूर लावून गेल
अन तू मागे वळून एकदाही नाही पाहिलस....

थांबले होते मी तिथेच वेड्या आशेने
अन मग मनात घर केल निराशेने .....

कधी विचारलसही नाही मी कशी आहे ?
तुला काय म्हणा त्याच, आतातर आपली ओळखही नाही ....

आता गर्दीतही एकट वाटत
अन अंधारही जवळचा भासतो ....

खोट बोलण मला कधी जमलाच नाही
अन तू खर कधी सांगितलसच नाही...........

कस बोलून गेलास रे तू यात फायदा नाही तुझा ?
मोजूनमापून प्रेम नाही जमल मला हा काय आहे दोष माझा ?

वाटल नव्हत कधी तू असा निर्दयी असशील
अचानकच मला अस अर्ध्या वाटेत सोडशील ...........

कोमल .....................४/२/१०

कळत नाही.....


ओढ म्हणजे काय ते जीव
लावल्याशिवाय कळत नाही.....
प्रेम म्हणजे काय ते स्वतः
केल्याशिवाय कळत नाही.....
विरह म्हणजे काय ते प्रेमात
पडल्याशिवाय कळत नाही.....
जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही.....
दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग
झाल्याशिवाय कळत नाही.....
सुख म्हणजे काय ते दुसर्यांच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही.....
समाधान म्हणजे काय ते आपल्यात
शोधल्याशिवाय कळत नाही.....
मैत्री म्हणजे काय ते जीव
लावल्याशिवाय कळत नाही.....
आपली माणस कोण ते
संकटांशिवाय कळत नाही.....
सत्य म्हणजे काय ते डोळे
उघडल्याशिवाय कळत नाही.....
उत्तर म्हणजे काय ते प्रश्न
पडल्याशिवाय कळत नाही.....
जबाबदारी म्हणजे काय हे त्या
सांभाळल्याशिवाय कळत नाही.....
काळ म्हणजे काय हे तो निसटून
गेल्याशिवाय कळत नाही.....
मृत्यू म्हणजे काय हे तो समोर
आल्याशिवाय कळत नाही.....

कोमल ................४/३/१०

भास ...


सहजच सुचलेले अन काही अनुभवलेले भास .......

भास .........
अंधाराचा
दाट गडद सावलीचा
भास .........
भीतीचा
अंधारलेल्या डोहाचा
भास .........
सावलीचा
सतत पाठलाग करणारा
भास .........
एकटेपणाचा
गर्दीतही अस्वस्थ करणारा
भास .........
आपलेपणाचा
मनाला दिलासा देणारा
भास .........
विश्वासाचा
मनाला आधार देणारा
भास .........
नात्यांचा
जिव्हाळ्याचा, आपुलकीचा
भास .........
यशाचा
अपयशातून मार्ग दाखवणारा
भास .........
देवाच्या अस्तित्वाचा
नवी उर्मी देणारा
भास .........
मोठ्यांच्या आशीर्वादाचा
पंखात बळ देणारा
भास .........
माझ्याच अस्तित्वाचा
हे गूढ उकलण्याचा

कोमल.................२६/१/१०

भास ........
तुझ्या मैत्रीचा
खंबीर आधार देणारा
भास .........
तुझ्या सोबतीचा
मनाला उभारी देणारा
भास .........
तुझ्या स्पर्शाचा
मन मोहरून टाकणारा
भास .........
तुझ्या आवाजाचा
शांततेतही घुमणारा
भास .........
तुझ्या प्रीतीचा
माझ्या अस्तित्वाला अर्थ देणारा
भास .........
तुझ्या विरहाचा
मन अस्वस्थ करणारा

कोमल ................२६/१/१०

भास .........
कोंडलेल्या शब्दांचा
भास .........
अस्वस्थ मनाचा
भास .........
सुकलेल्या अश्रूंचा
भास .........
कोमेजलेल्या हास्याचा
भास .........
अंधारलेल्या दिशांचा
भास .........
अगतिक आत्म्याचा
भास .........
हरवलेल्या आत्मविश्वासाचा

कोमल ...............२९/१/१०

भास ........
तू असण्याचा
जवळच
भास ........
तू नसण्याचा
माझ्यासोबत
भास ........
तू येण्याचा
नकळत
भास ........
तू जाण्याचा
सहजच
भास ........
तुझ्या आवाजाचा
शांततेत
भास ........
तुझ्या हसण्याचा
मनापासून
भास ........
तू जवळ असण्याचा
माझ्यासोबत
भास ........
तुझ्या अस्तित्वाचा
हवाहवासा वाटणारा

कोमल ............२९/१/१०

भास .........
नजरेचा
अंगार फेकणारा
भास .........
नजरेचा
मनाला जाळणारा
भास .........
नजरेचा
आगीशिवाय पोळणारा
भास .........
नजरेचा
क्रूरपणे हसणारा
भास .........
नजरेचा
किळस आणणारा
भास .........
नजरेचा
जिवंतपणीच मारणारा

कोमल ...........३०/१/१०

भास .......
सुखद स्पर्शाचा
तुझ्या
भास .......
रेशमी वस्त्रांचा
तुझ्या
भास .......
गोड गाण्यांचा
तुझ्या
भास .......
खळाळून हास्याचा
तुझ्या
भास .......
मोहक सुगंधाचा
तुझ्या
भास .......
मिठीत विसावण्याचा
तुझ्या

कोमल ...........३०/१/१०

भास...........
हसणाऱ्या चंद्रकोरीचा
भास...........
चोरून बघणाऱ्या चांदण्यांचा
भास...........
खाऱ्या वाऱ्याचा
भास...........
गुंजणाऱ्या लाटेचा
भास...........
रात्रीच्या शांततेचा
भास...........
फक्त आपल्या गुंतलेल्या श्वासांचा

कोमल ................३०/१/१०

भास धुराचा
जळक्या सिगरेटीचा
भास कुजका
अर्धवट जळलेल्या प्रेताचा
भास कोंडलेल्या
गुदमरलेल्या श्वासाचा
भास पावलांचा
अंधारात पळत सुटणाऱ्या
भास पानांचा
शांतता भंग करणाऱ्या
भास अस्तित्वाचा
अदृश्य सावलीचा
भास घामाचा
भीतीने दारारून फुटलेला

कोमल ...................१५/२/१०

दूर त्या किनाऱ्यावर......


दूर त्या किनाऱ्यावर
आजही मी उभी आहे
वाट पाहत तुझी निरंतर ...........

परतीचे वचन देऊन गेलास
पण अजूनही नाही परतलास .......

चातकासारखी तुझी वाट
पाहून थकले रे मी आता.........

आधी तर तू परत येण्याची होती खात्री
पण आता तू मलाच विसरण्याची वाटते भीती .......

आता तर तू सोडून जाण्याचीच करतोस भाषा
कधी परतशील हि मावळली अशा.........

नाही रे कधी मागितले तुज जवळ चंद्र तारे
फक्त तुझा थोडासा सहवास मलाही हवा रे ........

पण आता नाही मागणार तुजवळ काही
माहित आहे, तुला माझ्यासाठी वेळ नाही ........

पाहू ! असेल जर नशिबात तर भेटू परत
मी वाट पाहत आहे तुझी निरंतर ...........

कोमल ...............१८/१/१०

आयुष्यातील काही क्षण ....

आयुष्यात काही क्षण असेही येतात .......

ज्याची वाट बघते मन, त्याचा निरोपही येत नाही
अन ज्याची नसते अपेक्षा त्याचे उत्तर येते आधी

कधी रक्ताची नातीही नकळत तुटतात
तर कधी बिनरक्ताचीही सहज जपली जातात

कधी ओळखीचे चेहरेही परके भासतात
तर कधी अनोळखीही गर्दीत आपलेसे वाटतात

आसवे ज्याच्यासाठी गळतात तो न जाणे त्याची किंमत
अन ज्याच्याकडे होते दुर्लक्ष तो मोजतो आपल्या हास्याची किंमत

कधी जन्मभर साथ देऊनही माणूस नाही कळत
तर कधी क्षणातच अनोळखीही दाखवतो आपली ओळख

कधी सोबत असूनही प्रेम आटते
तर कधी विरहहि संगमाप्रमाणे भासते

इथे लोक माणसांपेक्षा दगडांवर खर्च करतात
नंतर बाराव्याचे जेवणही समारंभपूर्वक देतात

कोमल

आठवणी ....


आठवणी ....

ग्रिष्मातल्या उन्हासारख्या
चटका देऊन जाणाऱ्या .....

श्रावनातल्या पावसासारख्या
चिंब भिजवून टाकणाऱ्या.....

काल्या गडद सावलीसारख्या
सतत सोबत करणाऱ्या ......

गोड सुंदर स्वप्नासारख्या
डोळे उघडल्यावर नाहीशा होणाऱ्या .....

मनाच्या कोपर्यात जपलेल्या
अचानक कधीतरी उचंबळून येणाऱ्या .....

कालाच्या ओघात पुसत झालेल्या
नकळत डोळे पाणावणाऱ्या.....

कोमल ......४/१/१०

आठवणी ......

गर्दीत हरवलेल्या
धुरकट झालेल्या
तरीही डोळे पाणावणाऱ्या .....

नकळत आलेल्या
मार्ग चुकलेल्या
तरीही मनात जागा मिळवणाऱ्या......

नको असलेल्या
सतत पाठलाग करणाऱ्या
तरीही न चुकता रोज भेटणाऱ्या .....

चोर पावलाने येणाऱ्या
मनाचा ताबा घेणाऱ्या
मनामध्ये कायम वास्तव करणाऱ्या ......

सहज आलेल्या
नकळत स्मित फुलवणाऱ्या
आणि नेहमी हव्याहव्याशा वाटणाऱ्या .....

कोमल..........४/१/१०

आठवणी ........

गोड मधाच्या थेंबासारख्या,
सुखावून जाणाऱ्या .....

मंद थंडगार वाऱ्यासारख्या,
बेधुंद करणाऱ्या ......

उष्ण तप्त सूर्यासारख्या,
चटका देऊन जाणाऱ्या ......

कडू कारल्याच्या फोड़ीसारख्या,
सगळच बेचव करणाऱ्या .......

दाट गडद सावलीसारख्या,
सतत पाठलाग करणाऱ्या ....

मंद मधुर संगीतासारख्या
नकळत गुणगुणल्या जाणाऱ्या .....

गुंगवून टाकणाऱ्या पुस्तकासारख्या,
मंत्रमुग्ध करणाऱ्या ......

मस्त मजेत डुलणाऱ्या फुलासारख्या,
नकळत हसवणाऱ्या......

कोमल .........४/१/१०

कारण ..

खरंच लागतात का हो कारण प्रत्येक गोष्टीला?

जन्माला घालताना कारण
लागत का हो आपल्या आईला ?

स्वतःचे त्रास ठेउन बाजूला कारण
लागत का हो बाबांना वाढवताना आपल्याला ?

बिनरक्ताची नाती जपताना कारण
लागत का हो आपली मैत्री टिकवायला?

कधीतरी सहज जुळलेले बंध सांभाळताना कारण
लागत का हो प्रेमात पडायला?

अन मग प्रेमात पडल्यावर कारण
लागत का हो उगाच रात्र जागवायला?

जर कधी दुरावा आला तर कारण
लागत का हो कुठेही, कधीही रडायला?

सगळा त्रास लपवत हसताना कारण
लागत का हो आयुष्य जगायला?

कोमल ............................१८/१२/०९

हास्य ........

एक निरागस हास्य ........
दगडालाही पाझर फोड़ते

एक विकट हास्य ......
काळजालाही पोखरुन काढते

एक प्रेमळ हास्य ......
मायेची पाखरण करते

एक मोहक हास्य ......
डोळ्यांची झोपच उड़वते

एक स्मित हास्य .......
गर्दीतही आपलेपणा देते

कोमल

पहाट...

पहाट...
सुगंधाची
उमलत्या कळ्यांची ll
पहाट ...
मंजुळ स्वरांची
चिमुकल्या किलबिलाटांची ll
पहाट ...
गंभीर घंटानादाची
अभंग अन श्लोकांची ll
पहाट ...
उद्याची
उजळलेल्या दिशांची ll
पहाट ...
लगबगीची
नव्या दिवसाची सुरवात करण्याची ll

कोमल ..................२३/१/१०

स्पर्श एक अनुभूती ............


स्पर्श मायेचा
थरथरत्या हातांचा ll

स्पर्श हळवा
दाटलेल्या कंठाचा ll

स्पर्श आधाराचा
खंबीर मनाचा ll

स्पर्श प्रेमळ
हवाहवासा वाटणारा ll

स्पर्श कोरडा
गोठलेल्या मनाचा ll

स्पर्श ओला
भिजलेल्या आसवांचा ll

स्पर्श हळुवार
रोमांच फुलवणारा ll

स्पर्श किळसवाणा
विकृत मनाचा ll

स्पर्श शेवटचा
निरोप घेणाऱ्या हातांचा ll

कोमल ....................२१/२/१०

पाऊलखुणा...........


पाऊलखुणा भूतकालाच्या......
आठवणीच्या अंधारात अडकलेल्या

पाऊलखुणा वर्तमानाच्या.......
वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या

पाऊलखुणा भविष्याच्या.......
नवीन उषेची वाट पाहाणाऱ्या

पाऊलखुणा एकटेपणाच्या.......
गर्दीतही परक करणाऱ्या

पाऊलखुणा अंधाराच्या..........
भितीच्या गर्तेत ढकलणाऱ्या

पाऊलखुणा प्रकाशाच्या.........
आशेचा किरण दाखवणाऱ्या

पाऊलखुणा अस्तिवाच्या........
स्वाभिमानाने जगायला शिकवणाऱ्या

कोमल

कधीतरी सहज येऊन जा ........


कधीतरी सहज येऊन जा ........
श्रावणातल्या सरीसारख बरसून जा

कधीतरी सहज येऊन जा ........
ग्रीष्मातल्या उन्हासारख प्रेमानेच थोडस रागवून जा

कधीतरी सहज येऊन जा ........
शरदातल्या चांदण्याप्रमाणे माझे आयुष्य उजळून जा

कधीतरी सहज येऊन जा ........
शिशिरातल्या थंड वाऱ्याप्रमाणे माझे अश्रू गोठवून जा

कधीतरी सहज येऊन जा ........
माझ्या जखमांवर हळुवार फुंकर घालून जा

कधीतरी सहज येऊन जा ........
अन तुझ्यात मला विरघळवून जा

कधीतरी सहज येऊन जा ........
माझ्या स्वप्नांना विश्वासाची वाट दाखवून जा

कोमल .......................१६/२/१०

अजूनही तशीच आहे .....

अजूनही तशीच आहे ..........
ती फुललेली रातराणी
सुगंधान तिच्या मोहून घेणारी

अजूनही तशीच आहे ..........
ती मंद ज्योत तेवणारी
प्रतीक्षेत तुझ्या जागी राहणारी

अजूनही तशीच आहे ..........
तुझी ती बेधुंद गाणी
अन त्या वर्षावात मी भिजणारी

अजूनही तशीच आहे ..........
हि धुंद रात दिवाणी
अन प्रीत आपली त्यात फुलणारी

कोमल .....................७/३/१०

अजूनही तशीच आहे ............


अजूनही तशीच आहे ............
मी अन तुझी आठवण

अजूनही तशीच आहे ............
ती जागा जेथे भेटलो होतो आपण

अजूनही तशीच आहे ............
तू दिलेली ती गुलाबी, सुगंधी पत्र

अजूनही तशीच आहे ............
उध्वस्त अन हरवलेली मी

अजूनही तशीच आहे ............
माझी अचेतन काया,
शेवटची घटका मोजत तू परतण्याची वाट पाहत

कोमल...............१६/२/१०अर्थ ...........

अश्रू पुसणार कुणी असेल
तर रडण्यात अर्थ आहे ll
हसणार कुणी असेल
तर हसवण्यात मजा आहे ll
साथ देणार कुणी असेल
तर सोबत चालण्यात अर्थ आहे ll
मनवणार कुणी असेल
तर रुसण्यात अर्थ आहे ll
ओरडणार कुणी असेल
तर वेडेपणा करण्यात मजा आहे ll
हट्ट पुरवणार कुणी असेल
तर मागण्यात अर्थ आहे ll
आठवण काढणार कुणी असेल
तर दूर जाण्यात अर्थ आहे ll
स्वप्न जपणार कुणी असेल
तर स्वप्न बघण्यात अर्थ आहे ll
पण जर आपलच कुणी नसेल
तर जगण्यात काय अर्थ आहे ?

कोमल ................२३/१/१०

नाते ......

नाते

कधी क्षणभंगूर तर
कधी चिरकाल टिकणारे
न मागताच सोबत करणारे ...

कधी सुखदुखाची देवाण-घेवाण
तर कधी वाटतो आपलेपणा खास
दूर असुनही जवळ असल्याचा विश्वास ...

कधी हसवणारे कधी रडवणारे
चुकीच्या गोष्टींवर रागवणारे
कधी समजूत घालणारे तर कधी समजावून घेणारे ...

जरुरी नाही की ते असावे रक्ताचे
फ़क्त असावे निस्वार्थ आपुलकीचे
सहजच जुळणारे अन कायम सोबत करणारे ...

कोमल...............१५/१२/०९

आयुष्य असाव.........

आयुष्य असाव समुद्रासारख
अथांग, खोल पसरलेलं
तरीही किनाऱ्याशी जोडलेलं....

आयुष्य असाव समुद्रासारख
कधी शांत तर कधी खवळलेल....

आयुष्य असाव समुद्रासारख
कुठेतरी नभाला भिडलेलं....

आयुष्य असाव समुद्रासारख
तक्रार न करता सर्वांना
आपल्यात सामावून घेणार....

आयुष्य असावे समुद्रा सारख
सुख दुःखांच्या शिम्पल्यांनी सजलेलं....

आयुष्य असावे समुद्रा सारख .....
संघर्षाच्या लाटांनी जपलेलं.....

कोमल